युवा आशिया करंडक हिंदुस्थानी महिलांनी जिंकला

हिंदुस्थानी महिलांनी बांगलादेशचा 41 धावांनी धुव्वा उडवित पहिल्या युवा (19 वर्षांखालील) महिला आशिया चषक स्पर्धेच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरले. स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष असल्याने हिंदुस्थानी महिलांसाठी ही ऐतिहासिक कामगिरी ठरली. अर्धशतक ठोकणारी त्रिशा गोंगाडी या सामन्याची मानकरी ठरली.

हिंदुस्थानची अचूक गोलंदाजी

हिंदुस्थानकडून मिळालेल्या 118 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव 18.3 षटकांत 76 धावांवरच संपुष्टात आला. त्यांच्याकडून जुएरिया फिरदौस हिने सर्वाधिक 22 धावांची खेळी केली, तर फहोमिडा चोया (18) दुहेरी धावा करणारी आणखी एक फलंदाज ठरली. इतर फलंदाज केवळ हजेरीवीर ठरल्याने बांगलादेशला अंतिम लढतीत पराभव पत्करून उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. हिंदुस्थानच्या सर्वच गोलंदाजांनी अचूक कामगिरी केली. आयुषी शुक्लाने 3, तर पारूनिका सिसोदिया व सोनम यादव यांनी 2-2 फलंदाज बाद केले. व्हीजे जोशिथा हिला एक विकेट मिळाली.

त्रिशा गोंगाडीची अर्धशतकी खेळी

त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना यजमान हिंदुस्थानने 7 बाद 117 धावसंख्या उभारली. सलामीवीर त्रिशा गोंगाडी हिने 47 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह 52 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली म्हणून हिंदुस्थानला धावांची शंभरी ओलांडता आली. त्रिशा वगळता आघाडीच्या फळीतील सर्वच फलंदाजांनी निराशा केली. कर्णधार निकी प्रसाद (12), मिथिला विनोद (17) व आयुषी शुल्का (10) या दुहेरी धावा करणाऱ्या इतर फलंदाज ठरल्या. बांगलादेशकडून फर्जना इसमिन हिने सर्वाधिक 4 फलंदाज बाद केले. निशिता अॅक्टर निशीने 2, तर हबीबा इस्माईलने एक विकेट टिपली.