हिंदुस्थान आणि चीनमधील वाद तात्पुरता थंड बस्त्यात पडल्यानंतर पुन्हा एकदा कैलास मानसरोवर यात्रा सुरू होणार आहे. ही यात्रा मे महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता असून ही यात्रा आता फक्त 16 दिवसांत पूर्ण करता येऊ शकणार आहे. याआधी कैलास यात्रेला तब्बल 22 दिवस लागत असायचे. पिथौरागड ते लिपुलेख खिंडीत जाण्यासाठी 12 दिवस लागायचे, आणि उरलेले दहा दिवस तिबेटमध्ये जायचे. प्रवाशांना उत्तराखंडमध्ये 6 तर तिबेटमध्ये 10 दिवस लागतील. यामुळे भाविकांच्या प्रवासात 6 दिवसांची बचत होणार आहे. ये-जा आणि प्रवासासाठी प्रत्येकी 3 दिवस लागणार आहेत.
पुष्पा-2 पाहत असताना फरार आरोपीला अटक
दहा महिन्यांपासून फरार असलेला आरोपी पुष्पा-2 हा चित्रपट पाहत आहे, अशी माहिती मिळताच पोलिसांनी थेट चित्रपटगृहात एण्ट्री घेत आरोपीला बेडय़ा ठोकल्या. विशाल मेश्राम असे आरोपीचे नाव असून तो नागपूर येथील एका चित्रपटगृहात पुष्पा-2 चित्रपट पाहत असल्याचे पोलिसांना समजले. विशाल मेश्रामवर अमली पदार्थाच्या तस्करीसह 27 गुन्हे दाखल आहेत. मेश्रामची नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली असून लवकरच नाशिकच्या जेलमध्ये पाठवले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पेन्शनधारकांसाठी 31 जानेवारीपर्यंत डेडलाईन
देशातील उच्च पगारावर निवृत्ती वेतनासाठी नियोक्ताद्वारे वेतन तपशील ऑनलाईन भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. पेन्शनधारक हे तपशील 31 जानेवारी 2025 पर्यंत भरू शकतात. ईपीएफओने यासंबंधी माहिती दिली. संयुक्त पर्यायांच्या पडताळणीसाठी प्रलंबित अर्जावर प्रक्रिया आणि अपलोड केल्याची खात्री करण्यासाठी ही शेवटची संधी आहे, असे ईपीएफओने म्हटले आहे. ईपीएफओने आतापर्यंत मिळालेल्या अर्जांपैकी जवळपास 4.66 लाख प्रकरणांमध्ये अतिरिक्त स्पष्टीकरण मागितले आहे. पगाराचा तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी 2025 पर्यंत आहे.
2025 मध्ये ‘इस्रो’चे ऑक्सिओम-4 मिशन
हिंदुस्थान अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने युरोपियन स्पेस एजन्सी (ईएसए) सोबत ऑक्सिओम-4 मिशनसाठी पार्टनरशिप केली आहे. अंतराळवीर प्रशिक्षण, मोहीम अंमलबजावणी आणि संशोधन प्रयोगांवर सहकार्य करण्यासाठी हा करार आहे. या करारावर डॉ. एस. सोमनाथ आणि ईएसएचे महासंचालक डॉ. जोसेफ एश्बॅकर यांनी स्वाक्षरी केली. इस्रो आणि ईएसए हे दोन्ही आगामी ऑक्सिओम-4 मिशनचा भाग आहेत. ज्याचे नेतृत्व अमेरिकन खासगी कंपनी ऑक्सिओम स्पेस करत आहे. ऑक्सिओम-4 हे 2025 ध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.