इंग्लंड क्रिकेटो बोर्डाने (ECB) पुढच्या वर्षी होणाऱ्या Champions Trophy 2025 साठी संघाची घोषणा केली आहे. त्याच बरोबर जानेवारीमध्ये हिंदुस्थानात होणाऱ्या वनडे आणि टी-20 सामन्यांसाठीही संघाची घोषणा करण्यात आली असून कर्णधार पदाची जबाबदारी जोस बटलरच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीचा धमाका फेब्रुवारीमध्ये सुरू होणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च या दरम्यान स्पर्धा पार पडणार आहे. अद्याप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी इंग्लंडचा हिंदुस्थान दौरा पार पडणार असून या दौऱ्यामध्ये टी-20 आणि वनडे मालिका खेळवली जाणार आहे. याची सुरुवात 22 जानेवारी पासून होणार आहे. इंग्लंड आणि इंडिया यांच्यामध्ये प्रथम पाच सामन्यांची टी-20 मालिका पार पडेल. त्यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अनुषंगाने ही वनडे मालिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. परंतु या संघात अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला दुखापतीमुळे स्थान देण्यात आलेले नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टीम इंडियाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी जॉस बटलर इंग्लंड संघाचा कर्णधार असले. त्याच बरोबर जोफ्रा आर्चर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, लियान लिव्हिंगस्टोन, जेमी स्मिथ, आदिल रशीद, गस एटकिन्सन, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट, मार्क वूड यांचा समावेश आहे.
टीम इंडियाविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठीही जॉस बटलरच इंग्लंडचा कर्णधार असणार आहे. त्याच बरोबर रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस एटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रुक, ब्रेडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियान लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड या खेळाडूंचा समावेश आहे.
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये 22 जानेवारी पासून टी20 मालिकेला सुरुवात होईल. पहिला सामना कोलकाता येथे रंगणार आहे. त्यानंतर 25 जानेवारी रोजी चेन्नई, 28 जानेवारी रोजी राजकोट, 31 जानेवारीला पुणे आणि मालिकेतील शेवटचा सामना 2 फेब्रुवारीला मुंबईत खेळवला जाईल. त्यानंतर 6 फेब्रुवारीपासून नागपूरमध्ये उभय संघांमध्ये पहिला वनडे सामना खेळवला जाईल. दुसरा वनडे सामना 9 फेब्रुवारी रोजी कटक येथे आणि तिसरा वनडे सामना 12 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे.