सोयाबीनचे भाव पडले असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून राज्य सरकारने 3000 रुपये प्रति क्विंटल मदत शेतकऱ्यांना द्यावी, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवार म्हणाले आहेत. X वर एक पोस्ट करत ते असं म्हणाले आहेत.
रोहित पवार म्हणाले की, ”सोयाबीनचे भाव पडले असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यात विक्रमी खरेदी केली जात असल्याचे सांगितले असले तरी वस्तुस्थिती मात्र पूर्णतः उलट आहे. राज्यात 74 लाख टनाहून अधिक उत्पादन असताना सरकार केवळ 14 लाख टन खरेदी करणार असून त्यातही आतापर्यंत केवळ 15 टक्के खरेदी झालेली आहे.”
ते पुढे म्हणाले की, ”सद्यस्थितीत एकतर राज्यसरकारने वेगाने खरेदी करावी, तसेच केवळ 14 लाख टन उद्दिष्टाने महाराष्ट्रातल्या केवळ 18 टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी होऊ शकते. त्यामुळे सरकारने खरेदीचे टार्गेट वाढवायला हवे. सरकारच्या खरेदीला उशीर झाल्याने राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन आधीच अत्यंत कवडीमोल भावात विकले आहे, त्यामुळे अशा शेतकऱ्यांनाही 3000 रुपये प्रति क्विंटल मदत द्यावी.”