सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये खडाजंगी; महसूल लिपिकांकडून लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांवर हल्ला, शेतकरीही जखमी

उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यामध्ये महसूल लिपिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हाणामारीत काही लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी आणि शेतकरी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी काही महसुल लिपिकांना पोलिसांनी अटक केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर दोन महसूल लिपिकांना लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी 17 डिसेंबर रोजी अशीच तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यामुळे हे अधिकारी महसूल लिपिकांवर लक्ष ठेवून होते. याची कुणकुण महसूल लिपाकांना लागताच त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांवर हल्ला केला. तसेच शेतकऱ्यांना सुद्धा मारहाण करण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी शेतकरी आणि लाचलुचपत प्रतिबंधक पथकातील अधिकारी वीरेंद्र यांनी महसूल लिपिकांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

“अयोध्येमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने 17 डिसेंबर रोजी काही महसूल लिपिकांना लाच घेताना पकडले होते व त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. यावेळी आठ ते दहा जणांनी अधिकाऱ्यांशी गैरवर्तन करत हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना घेऊन जात असताना या पथकार महसूल लिपिकांनी हल्ला केला. एका महिला महसूल लिपिकाने सुद्धा लाचलूचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती पोलीस अधिकारी अखिलेश नारायन सिंह यांनी दिली.