पंजाबमधील मोहाली येथे मोठी दुर्घटना घडली आहे. येथे तीन मजली इमारत कोसळून यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दृष्टी वर्मा (20) हिचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफने तिला गंभीर अवस्थेत ढिगाऱ्यातून बाहेर काढले होते. तिला सोहाना रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दुसऱ्या मृताचे नाव अभिषेक असल्याचं सांगण्यात येत आहे.
एनडीआरएफ आणि लष्कराचे पथक सुमारे 18 तासांपासून बचाव कार्यात गुंतले आहेत. एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली 5 जण ढिगाऱ्याखाली अडकले. त्यात 3 मुले आणि 2 मुली होत्या. ढिगाऱ्याखाली अजूनही 3 जण अडकल्याची शक्यता आहे. आज सकाळी डॉक्टरांचे पथकही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. तसेच इमारतीच्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर ढिगाऱ्यात सापडला. यामुळे इमारत कोसळण्याच्या वेळी आत असलेल्या लोकांची माहिती मिळण्याची शक्यता आहे.
या दुर्घटनेतून बचावलेल्या एकाने सांगितलं की, इमारतीच्या तिसऱ्या मजल्यांवर जिम आहेत आणि उर्वरित 2 मजल्यांवर लोक भाड्याने राहत होते. रात्री एक महिला पतीला शोधण्यासाठी घटनास्थळी पोहोचली होती. तिचा पती अभिषेक येथे जिममध्ये व्यायाम करण्यासाठी आला होता. अपघात झाल्यापासून त्याचा फोन बंद आहे. सकाळी सापडलेला मृतदेह अभिषेकचा आहे. दरम्यान, ही घटना गुरुद्वारा सोहाना साहिबजवळ शनिवारी दुपारी साडेचार वाजता घडली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही इमारत सुमारे 10 वर्षे जुनी होती. त्याच्या शेजारी तळघराचे खोदकाम सुरू होते, त्यामुळे इमारतीचा पाया कमकुवत होऊन ती कोसळली, असं बोललं जात आहे. याप्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.