राजस्थानमधील जैसलमेर येथे शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी कौन्सिलची बैठक झाली. ज्यामध्ये अनेक मोठे निर्णय सर्वसहमतीने घेण्यात आले. या निर्णयांची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक गोष्टींवर जीएसटीचे दर वाढवण्यात आले, तर काही गोष्टींवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री आणि अर्थ राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या वस्तू स्वस्त आणि महाग झाल्या हे जाणून घेऊया.
जुन्या वाहनांसह ईव्हीवर जीएसटी वाढला
जुन्या गाड्यांवरील जीएसटी दर 12 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला. यामुळे आता जुनी कार आणि दुचाकी खरेदी करणं महागणार आहे. तर आरोग्य विमा आणि जीवन विम्यावरील जीएसटी दर कमी करण्याचा किंवा काढून टाकण्याचा निर्णयही पुढे ढकलण्यात आला आहे. यासोबतच झोमॅटो आणि स्विगी सारख्या ठिकाणांहून ऑनलाइन खाद्यपदार्थ ऑर्डर करण्यावरचा जीएसटी दर कमी करण्याचा प्रस्तावही पुढे ढकलण्यात आला आहे.
जीएसटी कौन्सिलने पॉपकॉर्नवर तीन प्रकारचे जीएसटी दर प्रस्तावित केले आहेत. म्हणजे 3 प्रकारचे कर लावले जाऊ शकतात. यातच मीठ आणि मसाल्यांमध्ये मिसळलेल्या तयार पॉपकॉर्नवर 5 टक्के जीएसटी लावण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र अट अशी आहे की, ते प्री-पॅक केलेले नसावे. प्री-पॅक केलेल्या आणि लेबल केलेल्या पॉपकॉर्नवर 12 टक्के जीएसटी लागेल, तर कॅरामल पॉपकॉर्नवर 18 टक्के कर लागेल.