माझ्या चारित्र्यांच हनन केलं जातंय! मुख्यमंत्र्याच्या आरोपावर अल्लू अर्जुनने सोडले मौन

अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. एकीकडे चित्रपट प्रचंड प्रसिद्धी मिळवत असताना दुसरीकडे मात्र याच चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. हैदराबादमध्ये चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये चेंगराचेंगरी दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेवरून अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तेलगंणाच्या विधानसभेतही हा मुद्दा मांडला होता. एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी तसेच मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनीही अल्लू अर्जुनवर गंभीर आरोप केले.

एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी केले गंभीर आरोप

‘एका महिलेचा मृत्यू होऊनही, कलाकाराने संपूर्ण चित्रपट पाहिला. यानंतर घटनेची माहिती मिळून देखील थिएटरमधून बाहेर येताना त्याने घटनेची दखल घेतली नाही. उलट गाडीत बसून लोकांना हाथ दाखव निघून गेले. या घटनेसंदर्भात अल्लू अर्जुनला अटक करून सरकार त्याच्यावर अत्याचार करत असल्याचा संदेश दिला जात आहे. कुठे आहे माणुसकी? मीही जाहीर सभा घ्यायलाजातो आणि हजारो लोक मला भेटायला येतात. मात्र गर्दीत कोणालाही दुखापत होऊ नये यासाठी मी सुरक्षेची पूर्ण काळजी घेतो. असे यावेळी अकबरुद्दीन ओवेसी म्हणाले.

अपघाताला सर्वस्वी अभिनेता जबाबदार : मुख्यमंत्री रेवंत रेड्डी

या अपघातावर बोलताना तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनीही चेंगराचेंगरीसाठी अभिनेत्याच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरले होते. अल्लू अर्जुन बेफिकीर होता. अपघातात जीव गमावलेल्या रेवती या महिलेच्या मृत्यूची माहिती मिळूनही तो चित्रपटगृहातून बाहेर पडला नाही. पीडित कुटुंब दर महिन्याला 30 हजार रुपये कमवते. पण केवळ त्यांचा मुलगा अल्लू अर्जुनचा फॅन आहे म्हणून ते त्याच्या सिनेमाच्या तिकीटावर 3000 रुपये खर्च करतात. असे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सांगितले.

अल्लू अर्जुन काय म्हणाला?
मुख्यमंत्र्यांच्या या आरोपानंतर अल्लू अर्जुनने पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माझ्या चारित्र्यांच हनन केलं जातंय, असा आरोप अल्लू अर्जुनने लावला आहे. तो एक अपघात होता. त्या कुटुंबासाठी मी माझ्या संवेदनाही व्यक्त करतो. यामध्ये मला कुणालाही दोष द्यायचा नाही. पण सध्या माझं चारित्र हनन करण्याचा प्रयत्न केला जातोय. यासंदर्भात खूप चुकीची माहिती पसरवली जातेय. जे काही घडलंय, त्यासाठी मी सगळ्यांची माफी मागतो. मी कोणत्याही राजकीय पक्षाला विरोध करण्यासाठी आलो नाही. मी केल्या 20-21 वर्षात जे काही कमावलं आहे, ते एका घटनेमुळे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. असे अल्लू अर्जून म्हणाला.