कोकणातील पाचही जिल्ह्यात सोशल मीडियावर पोलिसांचा वॉच, नियंत्रण कक्ष स्थापन करणार

आजकाल अनेकजण यूट्युब, फेसबुक, इन्स्टाग्राम तसेच व्हॉट्सअॅपवर फेक मेसेजेस तसेच व्हिडीओ पाठवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियाचा जेवढ्या चांगल्या गोष्टींसाठी उपयोग होतो तितकाच समाजविघातक कृत्यांसाठी त्याचा वापर केला जात असल्याचे आजपर्यंत अनेकदा समोर आले आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून कोकणातील पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत पाचही जिल्ह्यात एक विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केले जाणार आहेत. याचा शुभारंभ रायगड जिल्ह्यातून करण्यात आला आहे. त्यामुळे आता तुमच्या प्रत्येक पोस्टवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.

सामाजिक आणि जातीय तेढ निर्माण करण्यासाठी समाज माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो ही बाब लक्षात घेऊन पोलीस दलाकडून कोकणातील पालघर, ठाणे ग्रामीण, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात समाज माध्यम नियंत्रण कक्षाची स्थापना केली जाणार आहे. तसे निर्देश पाचही जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यातून या उपक्रमाची सुरुवात होणार असून, जिल्हा नियोजन समितीने यासाठी ३० लाखांचा निधीही मंजूर केला आहे. अलिबाग येथे पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अभिीजत शिवथरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे उपस्थित होते.

.. तर तत्काळ संपर्क करा

डिझेल तस्करांविरोधात कारवाईसाठी ठोस पावले उचलण्यात येत असल्याचे दराडे यांनी सांगितले. तसेच सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहनही त्यांनी केले. निनावी फोन करून कोणी तुम्हाला धमकावत असेल तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधा असेही दराडे यांनी सांगितले.

सागरी सुरक्षेला बळकटी मिळेल

सागरी सुरक्षेच्या दृष्टीने कोकण विभाग हा संवेदनशील आहे. दहशतवादी कारवायांसाठी कोकण पट्टीचा यापूर्वी वापर झाला आहे. त्यामुळे सागरी सुरक्षा बळकटीकरणासाठी पोलीस दलाकडून व्यापक पावले उचलण्यात आली आहेत. सागरी पोलीस ठाण्यांच्या निर्मिती करून त्या ठिकाणी प्रशिक्षित कर्मचारीवर्गाची नियुक्ती करण्यात आली आहे. किनारपट्टीवर बेकायदेशीर कारवायांना आळा बसावा यासाठी वेगवान गस्ती नौका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बोटींवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तटरक्षक दलाकडून प्रशिक्षण देण्यात येत आहे. किनारपट्टीवर काम करणाऱ्या विविध सुरक्षा यंत्रणामध्ये समन्वय असावा यासाठी नौदल, तटरक्षक दल, पोलीस, कस्टम यांच्या नियमित बैठकांचे आयोजन केले जात असल्याने सागरी सुरक्षेला बळकटी मिळेल असा विश्वास दराडे यांनी व्यक्त केला.