पॉपकॉर्न महागले, जुन्या गाड्यांवर कर वाढला; जीएसटीचा वरवंटा

महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला दिलासा देण्याऐवजी जीएसटी परिषदेने वरवंटाच फिरवला आहे. आरोग्य आणि जीवन विमा पॉलिसींवरील जीएसटी कमी करावा अशी कोट्यवधी जनतेची मागणी असताना हा कर जैसे थे ठेवला आहे. बच्चे कंपनींचा आवडता पॉपकॉर्नवरही 5 ते 18 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. जुन्या कार विक्रीवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 18 टक्के केला आहे. इलेक्ट्रिक कार खरेदीवरही 18 टक्के जीएसटी होणार आहे.

दरम्यान, जनतेकडून जीएसटीची वसुली करण्याच्या या धोरणामुळे महागाईचा भडका आणखी उडणार आहे. जीएसटी परिषदेची 55 वी बैठक राजस्थानातील जैसलमेर येथे झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला विविध राज्यांचे अर्थमंत्री उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत अर्थमंत्र्यांनी निर्णयांची माहिती दिली.

फुड डिलिव्हरीवरही 18 टक्के जीएसटी

झोमॅटो, स्वीगीसह इतर फुड डिलिव्हरी अॅपवरून खाद्यपदार्थ, जेवण मागवण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर सध्या 18 टक्के जीएसटी वसूल केला जातो. तो 5 टक्के करावा अशी जनतेची मागणी आहे. मात्र, यावर आज निर्णय झाला नाही. 18 टक्के जीएसटी कायम ठेवला आहे.