पश्चिमरंग – बाखची इन्व्हेन्शन्स

>> दुष्यंत पाटील

बाखच्या इन्व्हेन्शन्स आणि सिम्फोनिया या रचना आजही अतिशय प्रसिद्ध आहेत. एखादी छोटीशी संगीतातली कल्पना घेऊन एखादा संगीतकार सुंदर, परिपूर्ण अशी रचना कशी करू शकतो हेच बाखच्या इन्व्हेन्शन्स सिद्ध करतात.

महान संगीतकार बाख 1717 ते 1723 या काळात एका छोटय़ाशा प्रदेशाचा शासक असणाऱया प्रिन्स लिओपोल्डकडे ‘म्युझिक डायरेक्टर’चं काम करायचा. या काळात त्याला चर्चच्या संगीतापेक्षा वेगळं असं धर्माशी संबंध नसणारं संगीत रचण्याच्या बऱयाच संधी मिळाल्या. प्रिन्स लिओपोल्डच्या दरबारासाठी संगीत रचणं ही बाखची जबाबदारी होती. दरबारी ऑर्केस्ट्राकडून संगीत कार्यक्रमांच्या रंगीत तालमी करून घेणं, ऑर्केस्ट्रातल्या लोकांना गरजेप्रमाणे प्रशिक्षण देणं, ऑर्केस्ट्राची गुणवत्ता एका वेगळ्या उंचीवर नेणं या साऱया गोष्टीही त्याच्या कामात येत होत्याच. बऱयाचदा बाख स्वतःही कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट प्रकारे संगीत वाजवायचा. प्रिन्स लिओपोल्ड स्वतच एक उत्कृष्ट संगीतकार होता. त्यामुळे सतत उत्कृष्ट संगीत रचण्यावाचून बाखला पर्याय नव्हता. बाखच्या आयुष्यातला हा अतिशय सर्जनशीलतेचा काळ होता. ब्रँडनबर्ग कंचेटो, वेल टेम्पर्ड क्लॅव्हिएरासारख्या अजरामर संगीतरचना त्यानं याच काळात केल्या.

याच काळात, 1720 मध्ये बाखनं घरी आपला दहा वर्षांचा मुलगा विल्हेम याच्यासाठी ‘लिटिल कीबोर्ड बुक’ नावाचं एक छोटंसं पुस्तक लिहिलं. विल्हेम या काळात एक चांगला कीबोर्ड वादक, तसंच एक चांगला संगीतकार होण्यासाठीचं शिक्षण घेत होता. ‘लिटिल कीबोर्ड बुक’ ही बाखकडून आपल्या मुलाला एक प्रेमानं दिलेली भेट होती. हे पुस्तक म्हणजे छोटय़ा छोटय़ा संगीतरचनांचा संग्रह होता. यात कीबोर्ड वाजवण्यासाठीचं तांत्रिक कौशल्य वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी संगीतरचना होत्याच. पण याशिवाय ‘लिटिल कीबोर्ड बुक’मध्ये वादकाची संगीतातली सर्जनशीलता वाढवण्यासाठी जे काही करता येईल तेही सारं केलं होतं.

1723 मध्ये बाखचं प्रिन्स लिओपोल्डकडंचं काम संपलं. आता बाख लिप्झिग इथं काम करायला लागला. इथं त्याला इतर कामांसोबत एका शाळेतल्या मुलांना संगीत शिकवण्याचीही जबाबदारी होती. पूर्वी आपल्या मुलासाठी रचलेल्या ‘लिटिल कीबोर्ड बुक’मधून बरंचसं संगीत घेऊन त्यात काही महत्त्वाच्या सुधारणा करत त्यानं इन्व्हेन्शन्स आणि सिम्फोनिया यांची रचना केली. इन्व्हेन्शन्समध्ये एकाच वेळी दोन आवाज चालू असायचे तर सिम्फोनियामध्ये एकाच वेळी तीन आवाज चालू असायचे. इन्व्हेन्शन्समध्ये उजव्या हातानं एक मेलडी वाजत असतानाच डाव्या हातानेही एक मेलडी वाजायची. सिम्फोनियामध्ये यात अजून एक आवाज यायचा. अर्थात दोन्ही हातांना पाच पाच बोटं असल्यानं एकाच हाताची दोन बोटं एकाच वेळी दोन मेलडीज वाजवू शकायची. त्यामुळे दोन हातांनी तीन मेलडीज एकाच वेळी वाजवणं शक्य व्हायचं.

बाखच्या इन्व्हेन्शन्स आणि सिम्फोनिया रचनांनी बऱयाच गोष्टी साध्य होत होत्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाच वेळी दोन हातांनी दोन वेगवेगळ्या मेलडीज वाजवण्याचं अवघड कौशल्य या इन्व्हेन्शन्समुळे मिळत होतं. पण, फक्त कौशल्य प्राप्त करणं म्हणजे कला नसते! बाखच्या इन्व्हेन्शन्सना कलात्मक बाजूही होती. म्हणजे इन्व्हेन्शन्सचा सराव करणाऱया विद्यार्थ्यांची कलात्मक बाजूही आपोआपच विकसित होत होती. रचनेकडे बारकाईनं लक्ष दिलं तर विद्यार्थ्यांना संगीत रचण्याविषयीही महत्त्वाच्या गोष्टी समजत होत्या. नेमकं याच गोष्टी डोळ्यासमोर ठेवून बाखनं इन्व्हेन्शन्स आणि सिम्फोनिया यांच्या रचना केल्या होत्या.

या रचनांची खासियत म्हणजे त्या जितक्या संगीत शिकणाऱया विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत, तितक्याच त्या संगीत न शिकणाऱया श्रोत्यांमध्येही लोकप्रिय आहेत. एखादी छोटीशी संगीतातली कल्पना घेऊन एखादा संगीतकार सुंदर आणि परिपूर्ण अशी रचना कशी करू शकतो ते या इन्व्हेन्शन्सनं दिसत होतं.

बाखच्या इन्व्हेन्शन्स आणि सिम्फोनिया या रचना आजही अतिशय प्रसिद्ध आहेत. तब्बल तीनशे वर्षांनंतरही बाखची इन्व्हेन्शन्स आणि सिम्फोनिया यांच्या रचना इतक्या लोकप्रिय का असाव्यात हे पाहण्यासाठी आपण ब्दल्tल्ंा वर जाऊन बाखच्या inventions आणि simphonia या रचना नक्की ऐकूया!

 [email protected]