अभिप्राय – वैचारिक मुक्ततेचे विविधरूपी रंग

>> अस्मिता येंडे

मराठी साहित्यप्रकारातील ललित गद्य हा प्रकार लेखकाला अधिक प्रवाहीपणे व्यक्त होण्याची दिशा देत असतो. असेच लेखिका प्रा. प्रतिभा सराफ यांचे ‘प्रतिभारंग’ हे ललित गद्याचे पुस्तक स्वानुभवातून लाभलेल्या सकारात्मक दृष्टिक्षेपातील नंदादीप आहे. आपल्या आजूबाजूला, कुटुंबात, कामाच्या ठिकाणी असे अनेक लहान-सहान प्रसंग घडत असतात, पण त्या घटनेमागील सखोल अर्थ आपण लक्षात घेतोच असे नाही. लेखिकेने या लहान प्रसंगातील मोठा अर्थ, त्यामागील सखोलता याकडे दूरदृष्टीनुरूप पाहताना जे मनात विचार वलय निर्माण झाले, त्या वलयांना विस्तीर्ण परीघात मांडले आहे. जे साधे-सोपे असते व त्यात खोलवर काही रुजलेले असते, ते नेमकेपणाने पाहण्याची प्रतिभा या ‘प्रतिभावान’ लेखिकेकडे आहे. लेखिका या भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका असल्या तरी साहित्याची आवड त्यांना अशा विविधरंगी लेखनास प्रेरणा देते.

या ललित गद्यात कोणतेही विषय वर्ज्य नाहीत. कौटुंबिक, सामाजिक भान, मानवी भावना, विचारस्वातंत्र्य, दृष्टिकोनातील भेद, दायित्व तसेच अध्यात्म, लोकसंख्या, योगदान असे विविध विषय लेखिकेने हाताळले आहेत. मुख्य म्हणजे लेखांची आटोपशीर रचना, साध्या-सोप्या निवेदनशैलीसोबत विविध उदाहरणे यामुळे लेख वाचताना आपण त्या लेखाशी तादात्म्य पावतो. त्या लेखातील प्रसंग वाचताना मनात विचार येतो, लेखिकेने ज्या प्रकारे त्या घटनेकडे पाहिले किंवा ज्या प्रकारे आचरण केले, तसा विचार आपण का केला नसेल? अर्थात प्रत्येकाची विचार करण्याची दिशा, दृष्टी आणि गती वेगळी असते.

माणूस सुखाच्या शोधात असतो, पण जे आहे त्यात आनंद निर्मिती करता येऊ शकते, असा विचार केला तर अमुक गोष्टीकडे पाहण्याची वृत्ती बदलू शकेल. समस्येकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले तर बरेच प्रश्न सुटू शकतात. लेखिकेला या लेखांमधून हेच सांगायचे आहे. संवेदनशीलतेचा लेखिकेचा आयाम बरेच काही शिकवणारा आहे. अनेकविध लेखांतून जगण्याचा मंत्र देणारे हे पुस्तक संग्रही असावे असेच आहे.

‘प्रतिभारंग’ पुस्तक मनास आनंद देणारे आहे. या पुस्तकाचे मुखपृष्ठ प्रदीप म्हापसेकर यांनी साकारले आहे. तसेच ज्येष्ठ साहित्यिक अरुण म्हात्रे आणि रजनी कुलकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. डॉ. सुकृत खांडेकर यांनी पुस्तकाची पाठराखण केली आहे.

प्रतिभारंग
 लेखिका ः प्रा. प्रतिभा सराफ

प्रकाशक ः व्यास पब्लिकेशन हाऊस

 मूल्य ः 250 रुपये.