अमित शहांना सत्तेचा माज! शिवसैनिक आक्रमक, दांडेकर पुलावर रास्ता रोको

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत अनुद्‌गार काढले होते. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने दांडेकर पूल परिसरात आंदोलन करण्यात आले. ‘अमित शहा माफी मागा’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय…’ अशा घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला होता. सकाळी 11 च्या सुमारास आंदोलकांनी दांडेकर पूल परिसरात काही वेळ ‘रास्ता रोको’ करण्यात आला. ‘डॉ. आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिल्यामुळेच शहा हे गृहमंत्री झाले आहेत. त्यांच्यात सत्तेचा माज आला आहे,’ असा घणाघात शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांनी केला. यावेळी शहरप्रमुख गजानन थरकुडे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अनुद्‌गार काढले. संपूर्ण देशभरात त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा देवाचे नाव घेतले तर तुम्हाला स्वर्ग गाठायला मिळेल,’ असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते. त्याचा निषेध करण्याासाठी शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले. ‘देशातील पीडित लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम डॉ. बाबासाहेबांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवांबाबत आमच्या मनात प्रचंड आस्था आहे. ‘महामानवांविषयी काढलेली अशी वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत,’ असा खणखणीत इशारा आंदोलकांनी दिला. यावेळी उपस्थित आंदोलकांनी घोषणा देऊन शहांच्या वक्तव्याचा निषेध करीत ‘रास्ता रोको’ केला. परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात होता.

संविधानाने तुम्हाला गृहमंत्रिपदापर्यंत पोहोचवले – संजय मोरे

गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अनुद्‌गार काढल्याचा सर्व स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे. ‘राज्यघटनेच्या जीवावर अमित शहा गृहमंत्री असून, डॉ. बाबासाहेबांनी मिळवून दिलेला हक्क तुम्ही विसरला आहात. तडीपारीची कारवाई तुमच्यावर असतानाही संविधानाने तुम्हाला गृहमंत्रिपदापर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. याप्रकरणी शहांनी बिनशर्त माफी मागावी,’ अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांनी केली आहे.

सभा घेऊन दाखवावी, ‘शिवसेना स्टाइल’ उत्तर देऊ – गजानन थरकुडे

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी भाजपच्या मनात आकस असून, त्यांनी तो बोलून दाखवून दिला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. डॉ. बाबासाहेब हे आमच्यासाठी मोठे आहेत. कारण देव कोणीही पाहिला नाही; परंतु डॉ. बाबासाहेबांना पाहणारे अनुयायी आजही आहेत. गृहमंत्री अमित शहांनी पुण्यात सभा घेऊन दाखवावी. आम्ही त्यांना शिवसेनेच्या पद्धतीने उत्तर देऊ,’ असा खणखणीत इशारा शिवसेना शहरप्रमुख गजानन थरकुडे यांनी दिला.

प्रदेश संघटक वसंत मोरे, प्रसिद्धिप्रमुख अनंत घरत, उपशहरप्रमुख प्रशांत राणे, भरत कुंभारकर, शहर संघटक राजेंद्र शिंदे, किशोर रजपूत, बाळासाहेब भांडे, उमेश गालिंदे, नीलेश जठार, विभागप्रमुख सूरज लोखंडे, प्रसाद काकडे, गोविंद निंबाळकर, प्रसाद चावरे, संदीप गायकवाड, अजय परदेशी, अनिल माझिरे, मनीष जगदाळे, नंदू येवले, राजू चव्हाण, दिलीप पोमण, मारुती ननावरे, मकरंद पेठकर, अजित बांदल, युवासेनेचे शहर अधिकारी राम थरकुडे, परेश खांडके, गौरव पापळ, विलास नावडकर, ज्ञानंद कोंढरे, विजय जोरी, संजय साळवी, आरोग्य सेनेचे रमेश क्षीरसागर, नितीन निगडे, स्वप्नील जोगदंड, नितीन रावलेकर, अरविंद दाभोलकर, निखिल जाधव, तानाजी लोहकरे, प्रतीक गालिंदे, नितीन दलभजन, बाळासाहेब गरुड, अप्पा आखाडे, शिवाजी पासलकर, राहुल शेडगे, रमेश लडकत, गणेश घोलप, सुनील गायकवाड, नंदू जांभळे, देवेंद्र शेळके, शरद गुप्ते, सचिन मोहिते, मिलिंद माने, अमोल रणपिसे, गणेश वायाळ, सागर देठे, सतीश गवळी, शहादू ओव्हाळ, आकाश बालवडकर, महिला आघाडीच्या वतीने वैशाली कापसे, शीतल जाधव, कमल रोकडे, मथुराबाई गवळी, तसेच स्थानिक नागरिक, आंबेडकरप्रेमींनी आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.