महाड एमआयडीसी प्रचंड स्फोटाने आज हादरली. अॅस्टेक लाइफ सायन्स लिमिटेड या रासायनिक कारखान्यामध्ये अचानक एका रसायनने भरलेल्या टाकीमधून मोठ्या प्रमाणात आवाज येऊन काही क्षणात या टाकीचा मोठा धमाका झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी भयंकर होती की तीन किमीचा परिसर हादरून गेला. तसेच प्लांटचे पत्रे व लोखंडी तुकडे अक्षरशः बंदुकीच्या गोळीसारखे कामगारांच्या शरीरात घुसले. त्यामुळे नऊ कामगार जखमी झाले आहे. संतापजनक म्हणजे हे प्रकरण दडपण्यासाठी व्यवस्थापनाने कंपनीत मॉकड्रील सुरू असल्याचा बनाव केला होता. याप्रकरणी पोलिसांनी कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
महाड एमआयडीसी परिसरातील काळीज गावाच्या हद्दीत अॅस्टेक लाइफ सायन्स लिमिटेड ही कंपनी आहे. या कारखान्यात रसायनाच्या टाक्या आहेत. यातील एका टाकीत दुपारी अचानक आवाज येऊ लागला. त्यामुळे कामगार घाबरले आणि त्यांनी कंपनीच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने पळ काढण्यास सुरुवात केली. त्याचवेळी केमिकलच्या या टाकीचा धमाका झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी भयंकर होती की प्लांटवरील सिमेंटचे पत्रे उडून त्याचा चक्काचूर झाला. तसेच काही लोखंडाचे तुकडेदेखील इतरत्र उडाले. हेच तुकडे बंदुकीच्या गोळीप्रमाणे जीवाच्या आकांताने पळणाऱ्या कामगारांच्या शरीरात घुसले. दुर्घटनेत रितेश निंबरे (१९), वसंत जंगम (४३), आर्यन रॉय, दिनेश म्हसळकर (२१), प्रशांत चाचले (२२), प्रथमेश मुसळकर (२३), रामचंद्र गुलाबचंद आणि तेजस निंबरे अशी जखमींची नावे आहेत.
दुर्घटनेची माहिती कोणाला देऊ नका !
अॅस्टेक लाइफ कंपनीत झालेल्या स्फोटाने तीन किमी परिसरातील रहिवाशांच्या कानठळ्या बसल्या. नेमके काय झाले हे कुणाला कळत नव्हते. मात्र इतकी मोठी घटना असताना व्यवस्थापनाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. कंपनी गेटवर असलेल्या कामगारांना कंपनीत मॉकड्रील सुरू असल्याचे बाहेर सांगा असे सांगण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र हा बनाव काही वेळातच उघड झाला. याप्रकरणी पोलिसांनी प्लांट हेड निरंजन बर्डे, सुरक्षा अधिकारी ऋषिकेश भोज, शिफ्ट इन्चार्ज संकेत मोरे, एचआर मॅनेजर गौरी तेलंगे यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.