Maharashtra news – खातेवाटपाचा नारळ फुटणार की पुन्हा दिल्लीश्वरांचा कौल घेतला जाणार?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागला आणि 5 डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर 15 डिसेंबर रोजी महायुतीतील मंत्र्यांची नावेही जाहीर झाली. याला आता आठवडा उलटला असून दुसरीकडे हिवाळी अधिवेशनही संपत आले आहे. मात्र अद्याप खातेवाटप करण्यात आलेले नाही.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील रामगिरी बंगल्यावर महायुतीच्या नेत्यांचा चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात दोन्ही उपमुख्यमंत्री, विधानसभा आणि विधानसभेचे आमदार सहभागी होणार आहे. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये खातेवाटपावरून चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तरी खातेवाटपाचा नारळ फुटतो की पुन्हा दिल्लीश्वरांचा कौल घ्यावा लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

नागपुरात हिवाळी अधिवेशनआधी महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. स्पष्ट बहुमत मिळालेले असतानाही तब्बल 22 दिवसांनी फडणवीस सरकराचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात भाजपचे 19, शिंदे गटाचे 11 आणि अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे. मात्र या शपथविधीलाही आता एक आठवडा झाला असून अद्याप मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे नागपुरातील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीच प्रश्नांना उत्तरे देताना दिसली.

भाजप पक्षातील मंत्री

चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक उईके, आशिष शेलार, संजय सावकारे, नितेश राणे, आकाश फुंडकर, माधुरी मिसाळ

राज्यमंत्री – पंकज भोयर, मेघना बोर्डीकर, शिवेंद्रसिंहराजे भोसले

शिंदे गटाचे मंत्री

गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत, शंभूराज देसाई, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, आशीष जैस्वाल

राज्यमंत्री – योगेश कदम

अजित पवार गटाचे मंत्री

हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवळ, मकरंद जाधव, बाबासाहेब पाटील, इद्रनील नाईक