दादर-माहीममधील रखडलेल्या इमारतींचा पुनर्विकास मार्गी लावा, महेश सावंत यांची मागणी

माहीम विधानसभा मतदारसंघातील अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. त्यामुळे असंख्य रहिवासी हक्काच्या घरांपासून वंचित राहिलेले आहे. या इमारतीचा पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी एका स्वतंत्र अधिकाऱयाची नियुक्ती करण्याची मागणी शिवसेना आमदार महेश सावंत यांनी आज विधानसभेत केली.

महेश सावंत यांनी औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. माहीम विधानसभा मतदारसंघातील 33/7 अंतर्गत म्हाडाच्या पंधरा ते वीस इमारतींचा पुनर्विकास दहा ते पंधरा वर्षांपासून  रखडला आहे. परिणामी अनेक जण घरांपासून वंचित राहिले आहेत. काही कारणांमुळे काही विकासक जेलमध्ये गेले आहेत तर काही विकासक आर्थिकदृष्टय़ा कमकुवत झाले आहेत. पुनर्विकास रखडल्याने विभागातील रहिवासी घरांपासून वंचित आहेत. शासनाने यावर एक वेगळा अधिकारी नियुक्त करावा आणि या समस्येवर तोडगा काढावा. हक्काच्या घरापासून वंचित राहिलेल्यांना त्यांच्या मूळ घरात परत आणावे, अशी मागणी त्यांनी केली.