सत्ताधारी महायुती सरकार राज्याची कायदा सुव्यवस्था राखण्यास अपयशी ठरले असल्याची टीका विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. शिक्षण, आरोग्य, उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र पिछाडीवर गेला असून गुन्हेगारीत मात्र देशात दुसऱया क्रमांकावर आहे, असे दानवे म्हणाले. कापूस, सोयाबीन, तूर उत्पादक शेतकऱयांना सरकारने देशोधडीला लावले असून जनतेचे हित न साधता स्वतःच हित जपणारे हे स्वार्थी व अकार्यक्षम सरकार आहे, असा हल्लाबोल अंबादास दानवे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील भाषणात केला.
गेल्या आठवडाभरात राज्यातील विविध जिह्यांत घडलेल्या घटनांकडे सरकारने पाठ फिरवल्याने अंबादास दानवे यांनी सरकारवर टीकास्त्र डागले. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीत गुन्हेगारीत पहिला क्रमांक उत्तर प्रदेशचा असून महाराष्ट्र दुसऱया क्रमांकावर आहे. मागील वर्षात सरासरी 126 गुन्हय़ाची नोंद झाली आहे. 2023मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या 45 हजार 434 घटनांची नोंद झाली. सायबर गुह्यांमध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. मुख्यमंत्री यांचा जिल्हा असलेल्या नागपूर शहरात अधिवेशन सुरू असताना दोन टोळ्यांमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे, असे दानवे यांनी सांगितले.
अंबादास दानवे यांनी राज्यभरात घडलेल्या गंभीर गुह्यांचा लेखाजोखाच या वेळी मांडला. 12 ऑक्टोबर 2024 रोजी राज्याचे माजी विधानसभा सदस्य बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यापूर्वी त्यांची रेकी केली होती. आज राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्या घराची रेकी झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
पुणे येथे तुरुंगात जेलर पठाण यांना मारण्याचा प्रयत्न झाला आहे. म्यानमारमधील रोहिंग्याचे पुण्यात वास्तव्य असल्याचे समोर आले आहे. सत्ताधारी आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या झाली. परभणी प्रकरणात अटकेत असलेले सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू व बीडचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येबाबतही दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. या हत्येतील आरोपी वाल्मिकी कराड हा एका मंत्र्याच्या जवळचा कार्यकर्ता आहे. गेले चार दिवस त्याचे नागपूरमध्ये वास्तव्य असताना पोलीस त्याला पकडू का शकले नाहीत. आरोपींना राजकीय आश्रय देणाऱयांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
गुंड मोकाट आणि सुसाट
मलकापूर अर्बन बँकेतील घोटाळा, राधा को-ऑपरेटीव्ह बँकेतील घोटाळ्याच्या घटना समोर आल्या आहेत. छत्रपती संभाजी नगरमधील आदर्श पतसंस्थेच्या घोटाळय़ातही अद्याप कोणतीही कारवाई नाही. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेत गुंड मोकाट आणि सुसाट आहेत तर गतिमान सरकारचा गुन्हेगारांना धाक नाही अशी टीका दानवे यांनी केली.
तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात
महाराष्ट्रातील तरुणाई ही ड्रग्सच्या विळख्यात अडकली आहे. फूड अँड ड्रग्ज त्यावर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरले आहे. पोलीस सत्ताधाऱयांच्या हातातले बाहुले बनले असून सत्ताधाऱयांनी पोलीस बळाचा वापर करून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणूक काळात तडीपारीच्या नोटीस दिल्या आहेत. नांदेडमधील शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष वडुळे यांचे बोट छाटले गेल्याची घटना घडली आहे. मुंबई, ठाणे व नवी मुंबईत राजरोसपणे कायदे मोडले जात असल्याचा आरोपही दानवे यांनी केला.