मुंबईत गेल्या पाच-सहा महिन्यांपासून पाण्याची व्यवस्था बिघडली आहे. काही ठिकाणी गढूळ पाणी येते, काही ठिकाणी पाण्याचा दाब कमी असतो. मग टँकरचे पाणी आणावे लागतेय. यामुळे पोटाचे विकार जडतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या आमदारांची एक बैठक बोलावून यावर वेळीच काय उपाययोजना करता येईल, याबाबत माहिती द्यावी, अशी मागणी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारकडे केली.
नगरविकास आणि सार्वजनिक आरोग्य विभागावरील पुरवणी मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना आदित्य ठाकरे यांनी मराठी पाटय़ांपासून पोदार रुग्णालय, वरळी-शिवडी कनेक्टर, पिण्याचे पाणी आणि सेफ स्कूल संकल्पनेवर सूचना मांडल्या.
मराठी भाषेविषयी बोलताना ते म्हणाले की, ‘मराठी भाषेतील पाट्यांची सक्ती केली आहे. मराठी पाट्यांची अंमलबजावणी झालेली नाही. दुकाने, आस्थापनांवरच्या पाटय़ा मराठी भाषेतच असल्या पाहिजेत. कारण आपल्या राज्यात मराठीचा सन्मान झालाच पाहिजे.’
पोदारमध्ये अॅलोपॅथी रुग्णालय हवे
आरोग्य खात्याला सूचना करताना ते म्हणाले की, ‘वरळीत पोदार आयुर्वेदिक रुग्णालय आहे. या रुग्णालयात अॅलोपॅथीचेही रुग्णालय सुरू करावे अशी वरळीकरांची मागणी आहे. त्यामुळे आयसीयू, ऑपरेशन थिएटर, ओपीडीही येईल.’
वरळी-शिवडी कनेक्टरला उशीर का होतोय?
वरळी-शिवडी कनेक्टर हा 2021 मध्ये सुरू झाला. 2022 मध्ये 48 टक्के काम पूर्ण झाले होते आणि 2022 ते 2024 मध्ये फक्त 57 टक्क्यांपर्यंत काम पोहोचले आहे. हा कनेक्टर अटल सेतू आणि कोस्टल रोडला जोडतो. त्यामुळे हा सर्वात महत्त्वाचा कनेक्टर आहे. हा वरळी, माहीम आणि शिवडी मतदारसंघांतून जातो. या मतदारसंघांत अनेक चाळी आहेत. त्या विस्थापित होऊ शकतात. त्यामुळे या तीनही मतदारसंघांतील आमदारांना बोलावून माहिती दिली तर चाळी वाचवता येतील, रस्त्याचा मार्ग बदलता येईल. यामुळे सर्वांना फायदा होईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
संपूर्ण राज्यात एईडी डिव्हाईस लावा!
लोकांचे जीव वाचवणाऱया एईडी डिव्हाईसबद्दल बोलताना ते म्हणाले की, ‘एईडी डिव्हाईसमुळे हृदयविकारात जीव वाचवता येतो. हा एईडी डिव्हाईस प्रत्येक मॉल, थिएटर आणि सार्वजनिक ठिकाणी, क्रीडा संकुलात, विधिमंडळात लावला तरी अनेक जीव वाचू शकतात. कारण आजकाल वाहतूक काsंडीमुळे अॅम्ब्युलन्सला येण्यासाठी वेळ लागतो.’
सरकारी वसाहतीमध्ये दवाखाने
सरकारी कर्मचाऱयांच्या वसाहतींमध्ये दवाखाने असणे गरजेचे आहे. कारण पोलीस किंवा सरकारी कर्मचारी कामावरून घरी जातात. त्यांना दवाखान्यात किंवा रक्तचाचणीसाठी जाण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे या वसाहतींमध्येच दवाखाने असतील तर त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
‘सेफ स्कूल’ संकल्पना राबवा!
‘सेफ स्कूल’ ही संकल्पना महाविकास आघाडीने आणली होती. मात्र, गेल्या दोन-अडीच वर्षांत ही संकल्पना मागे पडली. म्हणजे एखाद्या शाळेचा 50 मीटरच्या परिघात कोणत्याही वाहनातून आलेल्या विद्यार्थ्यांना येण्यासाठी आणि परत जाण्यासाठी सुरक्षित झाला पाहिजे. शाळेतील विद्यार्थ्यांमधील ‘टाईप वन डायबेटिज’वर लक्ष देणे आवश्यक आहे. डोळय़ांची तपासणी गरजेची आहे. विद्यार्थ्यांना चष्मा लागला आहे की नाही हे अनेक मुलांना कळत नाही. दातांची तपासणी गरजेची आहे तसेच शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिक खाण्याचा अभाव आहे. अनेक घरांमध्ये मुले घरगुती हिंसाचाराच्या घटना पाहतात. आई-वडील दोघेही कामावर जातात. मन मोकळे करायला कोणी नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिक तपासणीही गरजेची आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.