संजय राऊत यांच्या मुंबईतील घराची रेकी, विधिमंडळात पडसाद; तातडीने दखल घेण्याचे विधानसभा अध्यक्षांचे सरकारला निर्देश

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या भांडुप येथील ‘मैत्री’ या निवासस्थानाची बाईकवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी आज रेकी केल्याने खळबळ उडाली. याचे विधिमंडळात पडसाद उमटले. त्यानंतर या घटनेची तातडीने दखल घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी राज्य सरकारला दिले.

संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांच्या घराची दोन अज्ञात तरुणांकडून रेकी करण्यात आल्याची माहिती शिवसेना गटनेते भास्कर जाधव यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्य़ाद्वारे दिली. त्यावर सरकारने या प्रकाराची तातडीने दखल घेण्याचे निर्देश तालिका अध्यक्ष चैनसुख संचेती यांनी सरकारला दिले. मोटरसायकलवरून आलेल्या या दोन तरुणांनी छातीवर पाच आणि कमरेवर पाच असे मोबाईल फोन लावले होते. संजय राऊत यांच्या घराजवळ उपस्थित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना तुम्ही कोण अशी विचारणाही केल्याचे भास्कर जाधव यांनी सभागृहात सांगितले. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

आदित्य ठाकरे यांची चौकशीची मागणी

‘संजय राऊत यांच्या घराची दोन जणांनी रेकी केली. याप्रकरणी चौकशी करून दोघानांही लवकरात लवकर अटक करावी तसेच संजय राऊत यांच्या वैयक्तिक व घराबाहेरील सुरक्षेत वाढ करावी, अशी मागणी शिवसेना नेते व शिवसेनेचे विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. कदाचित संजय राऊत यांच्या जिवाला धोका असू शकतो. त्यांच्यासोबत त्यांचे आमदार बंधू सुनील राऊत हे राहतात. एक खासदार आहेत तर एक आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सर्वस्वी सरकारची आहे,’ असे आदित्य ठाकरे म्हणाले.

नेमकं काय घडलं?

आज सकाळी 9.15 वाजताच्या सुमारास संजय राऊत यांच्या घराची बाईकवरून आलेल्या दोन व्यक्तींनी रेकी केली. सीसीटीव्ही पॅमेऱयात ते पैद झाले आहेत. या दोघांनी आपले चेहरे झाकलेले होते. मागे बसलेल्या व्यक्तीकडे 8 ते 10 मोबाईल होते. माध्यमांचे काही प्रतिनिधी तिथे हजर होते. त्यांनी हटकले असता दोघेही पसार झाले.

उद्धव ठाकरे यांचा पोलिसांना फोन

घटना समोर आल्यानंतर मला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोन आला. ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशीही बोलले आहेत, असे सांगताना मुंबई पोलीस सक्षम आहेत. माझा त्यांच्यावर विश्वास आहे. ते तपास करत आहेत. आमच्या घरावरती पाळत हे काही नवीन नाही. याआधीही असे प्रकार घडलेत. आम्हाला मारण्याचा प्रयत्न झाला. ‘सामना’ कार्यालय, माझ्या दिल्लीतील घराचीही रेकी झाली आहे, असे संजय राऊत म्हणाले. अडीच वर्षांपूर्वी राज्यात नवे सरकार आले होते. त्यानंतर विरोधकांची सुरक्षा काढून घेतली. हा अत्यंत निर्घृण प्रकार आहे, असा संताप राऊत यांनी व्यक्त केला.

रात्री उशिरा पोलीस प्रेस नोट; ते जीओचे कर्मचारी

मुंबई पोलिसांनी रात्री उशिरा प्रेस नोट काढून सीसीटीव्हीत दिसलेल्या व्यक्ती जीओशी संबंधित कंपनीचे कर्मचारी असल्याचे नमूद केले. एकूण चार व्यक्ती त्या भागात आल्या होत्या. जीओ मोबाईल नेटवर्कचा टेस्ट ड्राईव्ह ते घेत होते. सेलप्लॅन आणि इन्स्टा आयसीटी सोल्युशनचे ते कर्मचारी आहेत व इरिस्कन कंपनीसाठी काम करतात, असे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले, असे पोलिसांनी नमूद केले.