नव्या वर्षात केंद्र सरकार एफएसआय अर्थात चटई क्षेत्र निर्देशांक शुल्कावर तब्बल 19 टक्के जीएसटी अर्थात वस्तू व सेवा कर लागू करणार आहे. त्यामुळे घरांच्या किमती 10 टक्क्यांनी वाढू शकतात. परिणामी, नव्या वर्षात नव्या घराचे स्वप्न आणखी महागणार असून ईएमआय भरताना नाकीनऊ येणार आहेत. जीएसटी आकारण्यामुळे 50 लाख रुपये किमतीचे घर 5 लाख रुपयांनी महागणार असून कोट्यवधी रुपये किमतीचे आलिशान घर 10 लाख रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पुणे, दिल्लीतील घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या असताना आता घरे आणखी महागणार असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला अधिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.