पाचवेळा हरयाणाचे मुख्यमंत्रीपद भूषवणारे ओमप्रकाश चौटाला यांची आज सकाळी वयाच्या 89व्या वर्षी प्राणज्योत मालवली. गुरूग्राम येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इंडियन नॅशनल लोक दलाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले होते.
चौटाला यांनी मुख्यमंत्री असताना बनावट कागदपत्रांच्या आधारे 3 हजार शिक्षकांची भरती केल्याप्रकरणी त्यांना व त्यांचा मुलगा अजय चौटाला यांसह इतर 53 जणांना अटक करण्यात आली होती. त्यांनी शेवटच्या वेळी 2005 मध्ये रोडी या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढली. ओमप्रकाश चौटाला हे वयाच्या 82व्या वर्षी तुरुगांतून 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाले अन् देशभरात त्यांची चर्चा रंगली. जाट समाजाचा एक प्रमुख नेता म्हणून त्यांची ओळख होती.
चौटाला हे सातवेळा आमदार राहिले. चौटाला 1970 मध्ये पहिल्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरले आणि विजयीही झाले. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1935 मध्ये हरयाणाच्या सिरसा जिह्यातील चौटाला गावात झाला. ओमप्रकाश चौटाला यांच्या निधनानंतर राजकारणातील दिग्गजांनी शोक व्यक्त केला. हरयाणा सरकारने राज्यात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला.