जयपूरमध्ये गॅस टँकरचा भीषण स्फोट; 11 जण जिवंत जळाले, 35 प्रवासी गंभीर, 40 वाहने जळाली

एलपीजी गॅस टँकरला मागून आलेला ट्रक धडकल्याने गॅसगळती होऊन भयंकर स्फोट झाला आणि 11 जण जिवंत जळून त्यांचा अक्षरशः कोळसा झाला, तर 35 प्रवासी गंभीररीत्या भाजल्याची घटना आज पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास जयपूर-अजमेर महामार्गावर घडली. हा स्फोट इतका भीषण होता की, आगीच्या ज्वाळा तब्बल एक किलोमीटरपर्यंत गेल्या आणि उडणारे शेकडो पक्षीही होरपळून निघाले. दोन ते तीन किलोमीटरपर्यंतच्या अवजड वाहनांसह 40 गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. याचवेळी 43 प्रवासी घेऊन जाणारी स्लीपर बसही आगीच्या कचाट्यात सापडली आणि 20 प्रवासी होरपळले.

राज्य आणि केंद्र सरकारकडून आर्थिक मदत जाहीर

दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना राजस्थान सरकारकडून 5 लाखांची आर्थिक मदत तर जखमींना उपचारासाठी 1 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. तर पंतप्रधानांनी ‘एक्स’वरून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. दरम्यान, घटनेनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांप्रति शोक व्यक्त केला आहे.

शाळेसमोर स्फोट; मोठा अनर्थ घडला असता

एलपीजी टँकरचा स्फोट झाल्याची घटना शाळेसमोरच घडली. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. जर शाळा सुरू असताना ही घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता. मोठ्या संख्येने पालक, नागरिक आणि मुले आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असती. मृतांचा आकडा प्रचंड वाढला असता. घटना घडली त्यावेळी एक स्कूल बस मुलांना नेण्यासाठी रवाना होत होती. पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास अंधारच होता. दूरवरून आगीच्या ज्वाळा दिसत होत्या तसेच लोक रस्त्याने सैरावैरा पळताना आणि अंगावरचे कपडे काढून टाकताना दिसत होते, अशी माहिती बसचालकाने दिली.

आगीच्या ज्वाळांमुळे बाईकस्वारही कचाट्यात सापडले. हेल्मेट अक्षरशः चेहऱ्याला चिकटले आणि डोळे भाजले. अनेक लोकांनी अंगावरील पेटलेले कपडे काढून फेकले आणि होरपळलेल्या अवस्थेत धावत सुटले. जळालेल्या कपड्यांचा खचही रस्त्यावर पडल्याचे चित्र होते.

अपघाताचे वृत्त कळताच तब्बल 25 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. एकूण 43 जणांना रुग्णालयात आणण्यात आले. रुग्णालयात अर्धवट जळालेले, कोळसा झालेले मृतदेह तर कुणाचे हात, पाय, चेहरा भाजलेले रुग्ण दिसत होते. रुग्णालयात आणण्यात आलेल्या मृतदेहांपैकी एका मृतदेहाचे डोके, पाय आणि हात गायब होते. केवळ धड शिल्लक होते.

श्वास कोंडल्याच्या तक्रारी

स्फोटानंतर तब्बल सहा तास आसपासच्या परिसरातील लोकांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता तसेच डोळे चुरचुरत होते. दरम्यान, एकूण 43 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी सात जण अद्याप व्हेंटिलेटरवर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे रुग्णालयाचे डॉक्टर महेश्वरी यांनी सांगितले. दरम्यान, घटना नेमकी कशामुळे याबद्दलचे पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिकचे पथक घटनास्थळी दाखल झाले.