जंगलात बेवारस कारमध्ये 55 किलो सोने आणि 15 कोटींची रोकड

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये दोन दिवसांत प्राप्तिकर विभागाने अनेक ठिकाणी छापे टाकले. या छाप्यांत मोठ्या प्रमाणावर वसुली करण्यात आली. या पार्श्वभूमीवर भोपाळमधील जंगलात एका बेवारस कार सापडली असून त्यात 55 किलो सोने आणि 15 कोटींची रोकड सापडली. हा कुबेराचा खजिना कुणाचा आहे, याचा शोध घेतला जात आहे.

रातीबड परिसरातील मेंडोराच्या जंगलात एक बेवारस गाडी उभी असल्याची खबर प्राप्तिकर विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार रात्री दोनच्या सुमारास पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्या वेळी कारमध्ये दोन बॅगांमध्ये कार आणि सोने आढळले. ग्वाल्हेरमधील एका व्यक्तीच्या नावावर कार असल्याचे समजते.

आयटीच्या छापेमारीपासून वाचण्यासाठी कार भर जंगलात सोडून दिल्याचा अंदाज आहे. भोपाळमधील त्रिशूल कन्स्ट्रक्शन कंपनीचा मालक राजेश शर्मा या रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या अनेक ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाचे छापे सुरू आहेत. एका माजी वरिष्ठ नोकरशहाच्या निकटवर्ती समजल्या जाणाऱ्या राजेश शर्मा याच्याशी संबंधित लोकांच्या घरांवर छापे टाकण्यात आले.