वेब न्यूज – गिग इकॉनॉमी

ऑनलाइन सेवा क्षेत्र सध्या प्रचंड वेगाने वाढत आहे. दहा मिनिटात कोणतीही वस्तू घरपोच देणाऱ्या सेवांपासून ते घरापासून हव्या त्या ठिकाणी प्रवास घडवणाऱ्या सेवांचा वापर जोमाने वाढतो आहे. त्वरित सेवा उपलब्ध करून देणाऱ्या क्षेत्राचे हे वाढते महत्त्व बघता अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या या व्यवसायात उतरत आहेत. मात्र इथे सेवा देणारे कर्मचारी हे असंघटित क्षेत्रात मोडत असल्याने त्यांचे हाल कोणाला दिसत नाहीत असा एक मतप्रवाह वाढतो आहे. कधीही नोकरी जाण्याची टांगती तलवार, प्रचंड शारीरिक श्रम, वेळी-अवेळी करावे लागणारे काम, अत्यल्प मोबदला अशा अनेक अडचणी या गिग म्हणवल्या जाणाऱ्या इकॉनॉमीमध्ये कर्मचाऱ्यांना सहन कराव्या लागतात. मात्र नुकत्याच बंगलुरूच्या प्रवासी वाहतूक सेवा पुरवणाऱ्या एका बाईक रायडरने आपण महिन्याला 80 हजार रुपये कमावत असल्याचा दावा केल्याने एका नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.

‘पेटीएम’सारख्या प्रसिद्ध कंपनीच्या संस्थापकाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हा रायडर आपण उबेर आणि रॅपिडोसारख्या वाहतूक सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या मदतीने रोज 13 तास काम करून महिन्याला 80 हजार रुपये कमावतो, असे सांगत आहे. गिग क्षेत्रातील असुरक्षितता, कमी मानधन आणि शारीरिक कष्ट यामध्ये सकारात्मक बदल होत आहे का? असा प्रश्न अनेक लोक सोशल मीडियावर विचारत आहेत. तर दुसरीकडे काही लोकांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. सतत 13 तास गाडी चालवणे, प्रदूषणाचा सामना करणे हे आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकते, तसेच मानसिक स्वास्थ्यदेखील बिघडवू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. व्हिडीओच्या खरेपणाबद्दल देखील अनेकांनी शंका व्यक्त केली आहे. सदर रायडरने केलेला दावा खोटा आहे, असे मत काही लोकांनी मांडले असून, त्या संदर्भातली आकडेवारीदेखील काहींनी दिली आहे. महिन्याला 80 हजार कमावण्यासाठी प्रत्येक दिवसाला कमीत कमी किती पैसे कमवावे लागतील आणि त्यासाठी दिवसभरात किती प्रवास करावा लागेल याचे गणितदेखील काहींनी मांडले आहे.

स्पायडरमॅन