जनावरांची वाहतूक करताना जप्त केलेला टेम्पो परत देण्यासाठी टेम्पोमालक आणि त्याच्या मित्राकडून ६५ हजारांची लाच मागितल्याचे उघडकीस आल्यानंतर तडकाफडकी बदली करण्यात आलेल्या गांधीनगर पोलीस ठाण्याचे वादग्रस्त एपीआय, पीएसआयसह कॉन्स्टेबलवर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एपीआय दीपक शंकर जाधव (वय ४४, सध्या रा. अर्थव ओंकार कॉप्लेक्स, बापट कॅम्प, कोल्हापूर. मूळ रा. पेठकिनाई, ता. कोरेगाव, जि. सातारा), पीएसआय आबासाहेब तुकाराम शिरगारे (सध्या रा. विठूमाऊली अपार्टमेंट, निगडेवाडी, उचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर. मूळ रा. मु. पो. उमरगा चिवरी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) आणि कॉन्स्टेबल संतोष बळीराम कांबळे (वय ३३, रा. शिरोली हौसिंग सोसायटी, माळवाडी, शिरोली, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांची रात्री उशिरापर्यंत घराची झडती सुरू होती. तर शिरगारे हे प्रशिक्षणासाठी बाहेर असल्याने त्याला ताब्यात घेतले नव्हते.
तक्रारदाराचा जनावरे वाहतुकीचा व्यवसाय आहे. गांधीनगर पोलिसांनी जप्त केलेला टेम्पो सोडण्यासाठी आणि कोर्टात म्हणणे मांडण्यासाठी तक्रारदार पोलीस उपनिरीक्षक शिरगारे यांना २५ नोव्हेंबर रोजी भेटले होते. यावेळी त्यांनी ३० हजार रुपयांची मागणी केली. तसेच त्यांच्या सहकाऱ्याला सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी फोन करून गुन्ह्यात मदत करतो असे सांगत ३५ हजारांची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने ‘लाचलुचपत’कडे तक्रार दाखल केली. याच्या पडताळणीत शिरगारे यांनी तक्रारदाराला फोनवर पोलीस कांबळे याची भेट घेण्यास सांगितले होते. तसेच या भेटीत कांबळे याने शिरगारेंना समक्ष फोन केला. यावेळी शिरगारेंच्या सांगण्यावरून तक्रारदाराकडे प्रथम २० हजार आणि तडजोड करून १५ हजारांची मागणी केली. तर दीपक जाधव यांनी तक्रारदार अटकेत असताना या गुन्ह्यात मदतीसाठी पैसे घेतल्याची कबुली देत व गुन्ह्यात मदत करतो असे सांगत उर्वरित ३५ हजारांची मागणी केली. तसेच गाडी सोडण्यासाठी शिरगारेंना १० हजार मागितल्याचे निष्पन्न झाले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक बापू साळुंके यांच्या पथकाने ही कारवाई केली.
एपीआय दीपक जाधव यांची कारकीर्द वादग्रस्त
गांधीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना एपीआय दीपक जाधव यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. दीपावलीत उजगाव येथे फटाका विक्रेत्याकडून रात्री करण्यात आलेला रास्ता रोको, त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मध्यरात्री गांधीनगर ठाण्यात भेट देऊन काढलेली खरडपट्टी विशेष चर्चेत राहिली. शिवाय व्यापार पेठेतील शेकडो विक्रेत्यांकडून उकळलेल्या रकमांची चर्चा होऊ लागल्याने अखेर दोन आठवड्यांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दीपक जाधव यांची बदली केली. बदलीनंतरही त्यांच्याकडून वसुलीचे काम सुरू असल्याची चर्चा सुरू होती.