हिंदुस्थान-चीन सीमेवर शांतता नांदणार; डोवाल, वांग यी यांच्यात सहा मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा

हिंदुस्थानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात सहा मुद्दय़ांवर एकमत झाले. या चर्चेनंतर डोवाल हे बिजिंगमधून हिंदुस्थानसाठी रवाना झाले. दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण मुद्दय़ांवर चर्चा झाली. दोन्ही देशांमधील अनेक मुद्दे सारखेच असून दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे चीनने म्हटले आहे. दोन्ही देशांच्या सीमांवर शांतता राखणे तसेच पैलाश मानसरोवर यात्रा यांसह आरोग्य आणि विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्यासारख्या मुद्दय़ांचा चर्चेत समावेश होता.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवत्ते लीन जीयान यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली. तब्बल पाच वर्षांनंतर दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक झाली. यावेळी सीमेवरील मुद्दय़ांवर दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. दोन्ही देशांच्या विकासावर कोणताही विपरित परिणाम होऊ नये यादृष्टीने द्वीपक्षीय करार करण्यावर आणि विकासाला चालना देण्यावर दोन्ही देशांमध्ये एकमत झाले.

  • दोन्ही देशांच्या सीमेवर सहकार्य, देवाण-घेवाणीची प्रक्रिया अधिक मजबूत करणे तसेच चीनमध्ये हिंदुस्थानातील तीर्थयात्रेकरूंची यात्रा पुन्हा सुरू करण्यावर सकारात्मक चर्चा झाली.
  • नाथूला सीमेवर व्यापाराला चालना देण्यासाठी दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींनी दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये सहकार्य वाढावे अशी इच्छा व्यक्त केली.
  • याशिवाय द्वीपक्षीय, आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय मुद्दय़ांवर व्यापक आणि गांभीर्याने चर्चा झाली.