कुलगाममध्ये चकमकीत पाच दहशतवाद्यांचा खात्मा, दोन जवान जखमी

जम्मू-कश्मीरच्या कुलगाम जिह्यात गुरुवारी सकाळी सुरक्षा दलाच्या जवानांनी पाच दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. बराच वेळ चाललेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान जखमी झाले. येथील बेहिबाग परिसरातील कदेर भागात संशयित दहशतवाद्यांचा वावर असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून मिळताच सुरक्षा दलांनी शोधमोहीम राबवली. लष्कराच्या चिनार कॉर्प्सने ‘एक्स’वर पोस्ट करत घटनाक्रमाची माहिती दिली.

19 डिसेंबर रोजी या भागात संशयित हालचाली दिसून आल्या. मग हिंदुस्थानचे लष्कर आणि जम्मू-कश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लष्कराने प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात पाच दहशतवादी ठार झाले, तर दोन जवान जखमी झाले आहेत.