दिल्लीत येत्या 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाच्या मुख्य सभागृहाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी आज दिली. संमेलनाला सुमारे पाच हजार साहित्यप्रेमी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातून सुमारे 2500 प्रतिनिधी उपस्थित असतील. अगदी पाकिस्तानातील मराठी भाषिकही उत्सुक असल्याचे पवारांनी सांगितले.
दिल्लीत गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी संमेलनाच्या तयारीची माहिती दिली. संमेलनाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिले असून दोघेही सकारात्मक आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रित करणार आहोत, असे शरद पवार म्हणाले. मुख्य सभागृहाचे नामकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह असे करण्यात आलेय. लोकमान्य टिळक आणि यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने प्रवेशद्वार असतील, असे त्यांनी सांगितले.
संमेलनाला 2500 प्रतिनिधी महाराष्ट्रातून येणार आहेत. 1500 लोकांच्या निवासाची व्यवस्था केली आहे. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता ग्रंथदिंडी निघणार आहे, असे पवार म्हणाले.
पाकिस्तानातील मराठी भाषिकही इच्छुक
‘पाकिस्तानातील मराठी भाषिकांनी साहित्य संमेलनाला यायची इच्छा व्यक्त केली आहे. पण हा प्रश्न सोपा नाही. परराष्ट्र मंत्रालयाशी बोलावे लागेल. सरकारचे कन्फर्मेशन मिळेल की नाही हे सांगू शकत नाही, असे शरद पवार म्हणाले. कदाचीत 100 लोकांची महाराष्ट्र मंडळ नावाची संस्था आहे. विशाल राजपूत हे मुख्य आहेत. सिंध प्रांतात एक हजार लोक राहतात,’ अशी माहिती सरहदचे संजय नहार यांनी दिली.
मोदींची कार्यक्रमाला यायची इच्छा
‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना आम्ही आधीच निमंत्रण दिले. त्यांच्या सचिवांचा पह्न आला. वेळ कळवणार आहेत. सकाळी की दुपारी येणार हे सांगतील. त्यांना एक विनंती केली की, पंतप्रधानांचे निश्चित झाले तर आम्ही विद्या भवनात कार्यक्रम घेऊ. एक- दोन दिवसांत आम्हाला याबाबतची माहिती मिळेल, असे पवार म्हणाले.’
दोन रेल्वेगाड्या
साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रातून मोठय़ा प्रमाणावर साहित्यप्रेमी येणार आहेत. हे लक्षात घेता संयोजकाकडून रेल्वे खात्याकडे दोन विशेष रेल्वेगाडय़ा सोडण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती संजय नहार यांनी यावेळी दिली.