अग्निशमन दलात यापुढे कंत्राटी भरती होणार नसून यापुढील सर्व भरती प्रक्रिया कायमस्वरूपी कामगार-कर्मचारी म्हणून केली जाणार आहे. यासाठी मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेने पाठपुरावा केला. दरम्यान, कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत अतिरिक्त आयुक्त अमित सैनी, उप आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्याकडे बैठकही पार पडली. यावेळी प्रशासनाकडून मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला.
मुंबई अग्निशमन दलातील महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात नुकतीच पालिका प्रशासनाकडे बैठक पार पडली. यावेळी कामगार सेनेकडून मुंबई अग्निशमन दलात पंत्राटी पद्धतीने होणाऱया भरतीस विरोध करण्यात आला. यानंतर कंत्राटी पद्धतीने भरती होणार नाही असे आश्वासन पालिका प्रशासनाकडून देण्यात आले. शिवाय मुंबई अग्निशमन दलातील कर्मचाऱयांची सर्व प्रवर्गातील रिक्त पदे/कार्यशाळेतील रिक्त पदे पदोन्नतीने भरण्याबाबत, दुय्यम अधिकारी पदामध्ये वाढ करणे, निवृत्त कर्मचाऱ्यांचे सर्व दावे विहित वेळेत मिळण्याबाबत, कर्मचाऱयांच्या कष्ट व जोखीम भत्त्यामध्ये वाढ करणे, कर्मचारी कर्तव्यावर असताना मृत्यू अथवा अपंगत्व झाल्यास नुकसानभरपाईमध्ये वाढ करण्याबाबत, नवीन भरती झालेल्या अग्निशामक यांना सुरक्षात्मक उपकरणे व प्रशिक्षण भत्ता, वेतन तातडीने मिळण्याबाबत, अशा विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रशासनाकडून सर्व मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. यावेळी संघटनेच्या वतीने अध्यक्ष बाबा कदम, माजी महापौर-संघटनेच्या सरचिटणीस किशोरी पेडणेकर, प्रशांत तळेकर, उपाध्यक्ष अनील खराटे, चिटणीस मिलिंद वळंजू, उमेश सिंगासने, खजिनदार दशरत घनवट, उपचिटणीस पुष्कर शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी प्रशासनाच्या वतीने प्रमुख अग्निशमन दल अधिकारी आंबुलगेकर, सावंत, डी. एस. पाटील, प्रशासकीय अधिकारी मोगरे आदी उपस्थित होते.