मुंबई पालिकेचा लाचखोर पालिका अभियंता मंदार तारीला अखेर अटक;पाच महिन्यांपासून होता फरार

अनधिकृत बांधकामाविरुद्ध कारवाई न करण्यासाठी 2 कोटींची लाच मागणाऱ्या पालिका अभियंता मंदार तारीला अखेर गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. तो पाच महिन्यांपासून फरार होता.

ऑगस्टमध्ये विकासकाकडून 75 लाख रुपयांची लाच घेण्याच्या प्रयत्नात असताना एसीबीने सापळा रचला होता. त्यावेळी त्याचे दोन साथीदार रंगेहाथ पकडले होते. मात्र त्याने पळ काढला होता. पाच महिने बेपत्ता राहिल्याने सत्र न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. तसेच उच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तो गुरुवारी सत्र न्यायालयात हजर राहिला होता. याचवेळी एसीबीने त्याला अटक केली. तो पालिकेच्या के-पूर्व वॉर्डमध्ये कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत होता. विकासक गोल्डी सूद यांनी 8 ऑगस्ट 2024 रोजी केलेल्या तक्रारीवरून एसीबीने कारवाई केली. मंदार तारीने सरकारी कर्मचारी म्हणून काम करताना बेहिशेबी संपत्ती जमवल्याचे एसीबीच्या अधिक तपासात उघड झाले आहे. तारीने 1 कोटी 19 लाख 68 हजार 908 रुपयांचे तीन फ्लॅट्स खरेदी केले.