भाव कोसळल्याने लासलगावात शिवसेनेकडून कांदा लिलाव बंद, निर्यात शुल्क रद्द करून शेतकऱयांना अनुदान देण्याची मागणी

कांद्याच्या भावात गेल्या पंधरा दिवसांपासून सतत घसरण सुरू आहे. लासलगावात गुरुवारी प्रतिक्विंटल सोळाशे रुपये भाव झाल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने शेकडो शेतकऱ्यांसह लिलाव बंद आंदोलन केले. निर्यात शुल्क रद्द करून शेतकऱयांना अनुदान देण्याची मागणी केली. एक तासानंतर लिलाव पूर्ववत सुरू झाले.

नाशिक जिह्यात कांदा भावात सतत घसरण सुरू आहे. गुरुवारी लासलगाव येथे सरासरी भाव सोळाशे रुपये प्रतीक्विंटल झाला. उत्पादन खर्चही निघत नसल्याने हवालदिल शेतकरी संतप्त झाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख शिवा सुरासे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱयांनी लिलाव बंद पाडले. केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करीत घोषणा दिल्या. सुमारे एक तास हे आंदोलन सुरू होते. कांदा निर्यात शुल्क मागे घ्यावे, नाफेडमार्फत खरेदी थांबवून शेतकऱयांच्या खात्यावर अनुदान थेट जमा करावे, कोसळलेल्या कांदा भावाची केंद्र सरकारने दखल घ्यावी आदी मागण्या करण्यात आल्या. बाजार समिती प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले. यानंतर भावात सुधारणा झाली. सरासरी दर 2900 रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला. या आंदोलनात बाळासाहेब जगताप, संतोष पानगव्हाणे, अभिजीत डुकरे, वसंत खर्डे, नंदु कोराडे, गोरख संत यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक व शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

…अन्यथा जेल भरो

केंद्र सरकारने दखल घेऊन शेतकऱयांना दिलासा द्यावा, कांदा भावात सुधारणा झाली नाही, तर जेल भरो, रेल रोकोसारखे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवा सुरासे यांनी दिला आहे.