चॅलेंजर्स कॅरम स्पर्धेत काजल, सागरला अजिंक्यपद

महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी स्पर्धेत पुरुष एकेरी गटात महाराष्ट्राच्या सागर वाघमारे विरुद्ध महाराष्ट्राच्याच फॉर्मात असलेल्या महम्मद घुफ्रानला यांच्यात तीन तास रंगलेल्या अंतिम लढतील सागरने भाजी मारली. पहिला सेट सागरने 19-0 असा सहज जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले. परंतु अनुभवी घुफ्रानने दुसरा सेट 14-13 असा निसटता 1 गुणाच्या फरकाने जिंकून सामन्यात रंगत निर्माण केली. तिसऱया आणि अंतिम सेटमध्ये पाचव्या बोर्डनंतर घुफ्रानकडे 14-13 अशी 1 गुणाची आघाडी होती. मात्र अंतिम ब्रेक करण्याची संधी सागरकडे असल्याने त्याने त्याचा फायदा उठवत 6 गुणांची कमाई केली आणि तिसरा सेट 19-14 असा जिंकून या गटाचे विजेतेपद पटकावत 1 लाख 50 हजारांची कमाई करत चॅलेंजर्स चषकावर आपले नाव कोरले.

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित भारतीय आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत आणि इंडियन ऑइल, बँक ऑफ महाराष्ट्र, ओएनजीसी, बँक ऑफ इंडिया आणि एचपीसीएल यांच्या सहकार्याने आयोजित स्पर्धेच्या महिलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या काजल कुमारीने महाराष्ट्राच्या नीलम घोडकेवर विजय मिळवला.