हिंदुस्थानाविरुद्ध 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्याआधी ऑस्ट्रेलियाच्या अव्वल तीन फलंदाजांचा फॉर्मबद्दल ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज यष्टिरक्षक फलंदाज इयान हिली यांनी चिंता व्यक्त केली आहे. या फलंदाजांना प्राथमिक गोष्टींवर लक्ष देण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
ऑस्ट्रेलियाने पावसाचा व्यत्यय आलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ट्रव्हिस हेड आणि स्टिव्ह स्मिथ यांच्या शतकांच्या जोरावर 445 धावा केल्या, पण दुसऱ्या डावात त्यांचे फलंदाज अडखळले. त्यामुळे त्यांना 7 बाद 89 धावांवर डाव घोषित करावा लागला. हा सामना ड्रॉ झाला. त्यामुळे पाच सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे.
हिली यांनी सांगितले की, ‘मेलबर्न कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलिया अव्वल तीन फलंदाजांवर दबाव टाकेल असे मला वाटत नाही, पण ते फॉर्मात नाहीत. ते गंभीरपणे फॉर्मबाहेर आहेत.’
सलामीवीर उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्विनी आणि तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मार्नस लाबुशेन धावांसाठी संघर्ष करत आहेत.
हिली म्हणाले की, ‘हे तिन्ही फलंदाज फॉर्ममध्ये परत येऊ शकतील का, असा प्रश्न निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांना विचारायला हवा. आमचे अव्वल तीन फलंदाज फॉर्मात येतील याचा त्यांना विश्वास आहे? मेलबर्न कसोटी सामन्यात फॉर्मात परतण्यासाठी या तीन फलंदाजांसाठी सर्वोत्तम संधी असेल. मेलबर्नच्या खेळपट्टीवर फलंदाजांनाही मदत मिळते. या फलंदाजांनी प्राथमिक बाबींवर लक्ष द्यावे.’