अखेर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजनाचा तिढा सुटला. 2027 पर्यंत होणाऱ्या आयसीसीच्या स्पर्धांमध्ये हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील सामने तटस्थ ठिकाणी खेळविले जाणार असल्याचे आयसीसीने जाहीर केले. या हायब्रीड तोडग्याला बीसीसीआय आणि पीसीबीने होकार दिल्यामुळे दोन्ही संघ पुढील तीन वर्षे एकमेकांच्या देशात क्रिकेट खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
आयसीसीने बीसीसीआयच्या हायब्रीड मॉडेलला मान्यता देताना पीसीबीचीही मागणी मान्य करून गेले अनेक महिने सुरू असलेला आयोजनाचा वाद संपुष्टात आणला आहे. त्यामुळे आता आठ संघांची चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार 19 फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि या स्पर्धेचा अंतिम सामना
9 मार्चला खेळविला जाणार आहे.
बीसीसीआयने हिंदुस्थानचा संघ पाकिस्तानात खेळणार नसल्याचे जाहीर केल्यापासून चॅम्पियन्स ट्रॉफीचा वाद चिघळला होता. एकीकडे पाकिस्तानात खेळण्यास हिंदुस्थानी संघाने नकार दर्शवला होता तर पाकिस्तानला हायब्रीड मॉडेलनुसार स्पर्धा आयोजन करायचे नव्हते. अखेर आयसीसीने दोन्ही संघांच्या मागण्या मान्य करत चॅम्पियन्स ट्रॉफीसह पुढील तीन वर्षांत होणाऱया सर्व आयसीसी स्पर्धांचाही तिढा सोडवला आहे. यंदाची स्पर्धा हायब्रीड मॉडेलनुसार होणार असल्यामुळे हिंदुस्थानचे सर्व सामने दुबईत खेळवले जातील. यात हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्याचाही समावेश आहे. तसेच हिंदुस्थानचा संघ बाद फेरीत पोहोचला तर उपांत्य आणि अंतिम सामनेदेखील तटस्थ ठिकाणी खेळवले जातील आणि जर हिंदुस्थानचा संघ बाद फेरीत बाद झाला तर हे सामने पाकिस्तानच्या लाहोर आणि रावळपिंडी येथे होतील.
…म्हणूनच हायब्रीड मॉडेलचा स्वीकार
आगामी वर्षात हिंदुस्थानातही आयसीसीच्या तीन जागतिक स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत. हिंदुस्थानप्रमाणे पाकिस्ताननेही हायब्रीड मॉडेलची मागणी केल्यामुळे आयसीसी अडचणीत सापडली होती. चॅम्पियन्स ट्रॉफीप्रमाणे हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील लढतीचा वाद अन्य आयसीसी स्पर्धांमध्येही होण्याची शक्यता असल्यामुळे आयसीसीने आपल्या सर्व स्पर्धांमध्ये हायब्रीड मॉडेलचा अवलंब करण्याचे ठरवले. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पुढील वर्षी हिंदुस्थानात होणारा महिलांचा वन डे वर्ल्ड कप आणि 2026 मध्ये हिंदुस्थान आणि श्रीलंकेमध्ये संयुक्तपणे आयोजित केल्या जाणाऱ्या पुरुषांच्या टी-20 वर्ल्ड कप आयोजनाचा तिढा सुटला आहे. या स्पर्धांमधील हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील सामने तटस्थ ठिकाणी खेळविले जातील. 2028 साली पाकिस्तानात महिलांची टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा खेळविली जाणार आहे. त्यातही हाच फॉर्म्युला वापरला जाणार असल्याचे आयसीसीने आताच स्पष्ट केले आहे.
पीसीबीच्या तिरंगी मालिकेत हिंदुस्थानचाही समावेश
गेली अनेक वर्षे हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात कोणतीही तिरंगी मालिका झाली नसल्यामुळे पीसीबीने आयसीसीकडे तिरंगी मालिकेचा केलेला प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच हिंदुस्थान-पाकिस्तान आणि अन्य एका आशियाई संघामध्ये तटस्थ ठिकाणी तिरंगी मालिका आयोजित केली जाणार आहे. ही मालिका चौरंगी ही होऊ शकते. चॅम्पियन ट्रॉफी हायब्रीड मॉडेलनुसार खेळवली जाणार असल्यामुळे पीसीबीने नुकसानभरपाई म्हणून आयसीसीकडे तिरंगी मालिकेचा प्रस्ताव ठेवला होता. तो आयसीसीने मान्य केला आहे. गेल्या 12-13 वर्षांपासून उभय संघांमध्ये एकही द्विपक्षीय मालिका झालेली नाही. उभय संघ फक्त आयसीसीच्या स्पर्धा आणि आशिया चषक स्पर्धेच्या निमित्ताने एकमेकांशी भिडत आहेत. या तिरंगी मालिकेच्या निमित्ताने पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आणखी काही हाय व्होल्टेज सामने खेळवले जाणार असल्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.