हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी सचिव आणि खजिनदार या पदांसाठी निवडणूक घेण्यासाठी माजी मुख्य निवडणूक आयुक्त अचल कुमार ज्योती यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यासाठी आपल्या सर्वोच्च परिषदेची तातडीची बैठक बोलावली आहे. जय शहा (सचिव) आणि आशीष शेलार (खजिनदार) ही दोन्ही पदे अलीकडेच रिक्त झाली आहेत. शहा यांनी 1 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्षपद स्वीकारले तर शेलार यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. निवडून आलेल्या पदाधिकाऱ्याने राजीनामा दिल्यानंतर विशेष सर्वसाधारण सभा बोलावून त्याचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी मंडळाकडे 45 दिवस असतात. घटनेनुसार बीसीसीआयला निवडणुकीच्या किमान चार आठवडे आधी निवडणूक अधिकारी नेमावे लागतात. मंडळाच्या अधिकृत दस्तऐवजात म्हटले आहे की, मानद सचिव आणि मानद खजिनदार ही पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे ही पदे उर्वरित कालावधीसाठी निवडणुकीद्वारे भरणे आवश्यक आहे.