शेअर बाजारात उलथापालथ, अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या निर्णयामुळे घसरगुंडी

अमेरिकी फेडरल रिझर्व्हने लागोपाठ तिसऱयांदा व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्सची कपात करण्याचा निर्णय घेतला. फेडरलच्या या निर्णयाचा जबरदस्त फटका जगभरातील शेअर बाजारांना बसला. हिंदुस्थानातील शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली.

हिंदुस्थानी शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 964 अंकांनी घसरून 79 हजारांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 247 अंकांनी घसरून 23,951 अंकांवर बंद झाला. यूएस फेडच्या व्याजदराच्या कपातीच्या निर्णयानंतर हिंदुस्थानसह जगभरातील शेअर बाजारात घसरण झाली. फेडरलच्या या निर्णयानंतर अमेरिकन शेअर बाजारात आणखी 10 ते 15 टक्क्यांपर्यंत घसरण येऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अमेरिकी शेअर बाजारातील घसरणीचा फटका हिंदुस्थानी शेअर बाजारावरसुद्धा पाहायला मिळू शकतो. फेडरल रिझर्व्हने 2025 साठी केवळ महागाई वाढवण्याचा अंदाज वर्तवला नाही तर 2025 मध्ये व्याजदरात अपेक्षेपेक्षा कमी कपात करण्याचे संकेतसुद्धा दिले आहेत.

5.95 लाख कोटी स्वाहा

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना जोरदार झटका बसला. बीएसई लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 5.94 लाख कोटींनी घसरून 446.66 कोटींवर पोहोचले. याचाच अर्थ गुंतवणूकदारांना एका दिवसात तब्बल 5.94 लाख कोटींचा फटका बसला. फेडच्या व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमेरिकी बाजारातील इंडेक्स डाओ जोन्स 1123 अंकांनी घसरला.

या शेअर्समध्ये घसरण

सन फार्मा, भारती एअरटेल, अल्ट्रा सिमेंट, एलटी, नेस्ले इंडिया, मारुती, टायटन, पॉवर ग्रीड, टीसीएस, अदानी पोर्टस्, इंडस्इंड बँक, ऍक्सिस बँक, रिलायन्स, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, टाटा मोटर्स, जेएसडब्ल्यू, बजाज फिनसर्व, एनटीपीसी, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स आदी शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली.