हिंदुस्थानच्या खेळाडूंनी 2024 या वर्षामध्ये विविध खेळांमध्ये चमकदार कामगिरी करत देशाचा झेंडा अटकेपार रोवला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसाळेने कांस्यपदक जिंकत देशासह महाराष्ट्राचे नाव उंचावले. त्याच बरोबर मनु भाकरने एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्य पदक पटकावत इतिहास रचला. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी पदकांची लयलूट करत विक्रमाची नोंद केली. टीम इंडियाच्या पुरुष संघाने टी-20 वर्ल्डकप जिंकत 11 वर्षांचा वनवास संपवला. टीम इंडियाच्या महिला आणि पुरुष हॉकी संघाने आशियाई चषक जिंकत हिंदुस्थानी चाहत्यांचा विजय द्विगुणीत केला. बुद्धिबळ ऑलिम्पियाड ते बुद्धिबळाचे विश्वविजेतेपद पदकावत हिंदुस्थानने सूवर्ण कामगिरी केली.
1) बुद्धिबळाचा नवा राजा! वयाच्या 18 व्या वर्षी फिडेचे जगज्जेतेपद जिंकणारा डि. गुकेश पहिलाच
हिंदुस्थानचा 18 वर्षीय ग्रॅण्डमास्टर गुकेश डोम्माराजूने फिडे जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत तिरंगा फडकावला. गुकेशने हिंदुस्थानी बुद्धिबळ जगतासाठी सुवर्ण कामगिरी करत विश्वनाथन आनंदच्या विक्रमालाही मागे टाकत कॅण्डिडेट अजिंक्यपदापाठोपाठ जागतिक स्पर्धा जिंकत ‘बुद्धिबळाचा किंग’ असल्याचे दाखवून दिले. विश्वनाथन आनंदने 25 व्या वर्षी ही स्पर्धा जिंकण्याचा मान मिळवला होता, तर गुकेशने अठराव्या वर्षीच फिडेच्या जगज्जेतेपदावर मोहोर उमटवली.
2) हिंदुस्थानचा दस का दम; बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये महिला आणि पुरुष संघाने पटकावले सुवर्ण पदक
हिंदुस्थानने बुडापेस्ट (हंगेरी) येथे पार पडलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये पुरुष व महिला गटांत सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास घडविला. वैयक्तिक गटातही हिंदुस्थानी खेळाडूंनी चार सुवर्णपदके जिंकली. पुरुष व महिला गटांत दोन–दोन खेळाडूंनी अव्वल क्रमांक मिळविला. दोन्ही गटांत पाच–पाच बुद्धिबळपटूंनी कौशल्य पणाला लावत हिंदुस्थानचा ‘दस का दम’ दाखविला. 11 फेऱ्यांच्या या स्पर्धेत हिंदुस्थानच्या खुल्या संघाने 22पैकी 21 गुणांची कमाई करीत निर्विवाद वर्चस्व गाजविले, तर महिला संघाने 19 गुण मिळवीत बाजी मारली. पेंटाला हरिकृष्णा, आर. प्रज्ञानंद, विदित गुजराती, डी. गुकेश व अर्जुन इरिगॅसी यांनी पुरुष संघाचे विजेतेपद आपल्या नावावर केले. तर महिला संघाला तानिया सचदेव, वैशाली रमेशबाबू, हरिका द्रोणावल्ली, वंतिका अग्रवाल व दिव्या देशमुख यांनी सुवर्णपदक जिंकून दिले.
3) विश्वविजयाचा ‘सूर्योदय’, 11 वर्षाचा वनवास संपला; हिंदुस्थानने वर्ल्डकप उंचावला
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टी20 वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावले. टीम इंडियाने दिलेल्या 177 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी कडवी झुंज दिली. मात्र शेवटच्या षटकात सूर्यकुमार यादवने 2024 या वर्षातील सर्वोत्तम झेल पकडला. मिलरचा अप्रतिम झेल पकडल्यामुळे सामन्याला कलाटनी मिळाली आणि टीम इंडियाने T20 World Cup 2024 च्या चमचमत्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
4) आशियाई करंडकावर हिंदुस्थानचीच सत्ता, टीम इंडियाच्या हॉकी संघाने पटकावले नॉनस्टॉप विजयासह पाचवे जेतेपद
आशियाई अजिंक्यपद करंडकावर हिंदुस्थानी हॉकी संघाने आपली बादशाहत कायम ठेवली. विशेष म्हणजे टीम इंडिया संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिली. सलग सात सामने जिंकत हिंदुस्थानने फायनलमध्ये यजमान चीनचा 1-0 असा पराभव केला आणि पाचव्या आशियाई अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केला. हिंदुस्थानने आतापर्यंत 2011, 2014, 2018, 2021 आणि 2024 अशा पाच वर्षांत जेतेपदाला गवसणी घातली आहे.
5) पुरुष संघाच्या पाठोपाठ चीनला हारवत हिंदुस्थानी महिलांनीही आशियायी महिला हॉकी चॅम्पियनशिपच्या चमचमत्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले
आशियाई महिला हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफी स्पर्धेत पुन्हा एकदा ‘चक दे इंडिया’चा नारा घुमला. गतविजेत्या यजमान हिंदुस्थानने चीनचा कडवा प्रतिकार 1-0 ने मोडून काढत विजेतेपद राखण्याचा पराक्रम केला. हिंदुस्थानी महिलांचे हे तिसरे विजेतेपद ठरले.
6) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानने एकून 6 पदके जिंकली, मनु भाकरने रचला इतिहास
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनु भाकरने हिंदुस्थानला पहिले कांस्यपदक पटकावून दिले, त्यानंतर सरबजोत सिंगच्या सोबतीने मनू भाकरने दुसरे कांस्य पदक पटकावले. तसेच स्वप्निल कुसाळे, टीम इंडियाचा हॉकी संघ, नीरज चोप्रा आणि कुस्तीमध्ये अमन शेरावात यांनी कांस्य पदक पटकावले. टीम इंडियाने ऑलिम्पिकमध्ये एकून 6 पदके पटकावली. मनू भाकरने एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकण्याची किमया साधली आणि असा पराक्रम करणारी ती पहिली हिंदुस्थानी खेळाडू ठरली.
7) तब्बल 72 वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा डंका वाजला
कोल्हापूरच्या मऱ्हाटमोळ्या स्वप्नील कुसाळेने नेमबाजीच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्यपदक जिकले. विशेष म्हणजे 72 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावण्याचे महाराष्ट्राचे स्वप्न स्वप्नील कुसाळेमुळे साकारा झाले. 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानला पहिलेवहिले वैयक्तिक पदक जिंकून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यानंतर स्वप्नील ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा दुसरा महाराष्ट्रवीर ठरला.
8) नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावत सलग ऑलिम्पिक पदक जिंकम्याचा पराक्रम केला
हिंदुस्थानचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने आपली मोसमातील सर्वेत्तम 89.45 मीटर लांब फेक करत रौप्य पदक जिंकण्याचा पराक्रम केला. हिंदुस्थानच्या ऑलिम्पिक इतिहासात अॅथलेटिक्समध्ये सलग ऑलिम्पिक पदक जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याच बरोबर नीरज चोप्राने लॉसने डायमंड लीग 2024 मध्ये दुसरे स्थान पटकावले.
9) पॅरिस पॅरालिम्पिक हिंदुस्थानी खेळाडूंनी केली पदकांची लयलूट
हिंदुस्थानी पॅरापटूंनी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदक पराक्रम करताना नवा इतिहास रचला. त्यांनी स्पर्धेत 7 सुवर्णांसह 9 रौप्य व 13 कांस्य अशी एकूण 29 पदकांची लयलूट करीत ऐतिहासिक कामगिरी केली. हिंदुस्थानी पथकाने टोकियो ऑलिम्पिकमधील जिंकलेल्या आपल्या 19 पदकांचा विक्रम मोडीत काढला.
10) रोहण बोपण्णाने टेनिसमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन 2024 ची फायनल जिंकली
रोहन बोपण्णाने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावत इतिहास रचला. वयाच्या 43व्या वर्षी ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावणारा बोपण्णा सर्वाधिक वयाचा टेनिसपटू ठरला. मॅथ्यू एब्डेनच्या साथीने रोहनने जेतेपदावर नाव कोरलं. द्वितीय मानांकित रोहन-मॅथ्यू जोडीने बिगरमानांकित सिमोन बोलेली आणि आंद्रेआ वावासोरीवर 7-6 (7-0), 7-5 असा विजय मिळवला.