जय भीम, जय भीम… महाविकास आघाडीचं संविधान चौक, विधानभवन परिसरात आंदोलन; अमित शहांच्या वक्तव्याचा केला निषेध

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आज नागपूरमध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उमटले. विरोधी पक्षांनी आज नागपूरमध्ये संविधान चौकात आणि विधानभवन परिसरात अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी आंदोलन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमान प्रकरणी आज नागपूर येथील संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून व अभिवादन करून महाविकास आघाडीच्या आमदारांनी आक्रमकपणे आंदोलन केले. हातात बाबासाहेबांचे फोटो घेऊन आणि घोषणा देत सर्व आमदारांनी संविधान चौकापासून पायी चालत विधानभवनात प्रवेश केला.

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर येत “बाबासाहेब का ये अपमान नही सहेगा हिंदुस्थान”, “जय भीम, जय भीमच्या” जोरदार घोषणा महाविकास आघाडीच्या आमदारांनी दिल्या. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, सतेज पाटील, भाई जगताप यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांनी आंदोलन केले.