लिव्ह इन रिलेशनशीप आणि समलैंगिक विवाह हे समाजातील नियमाविरोधात असून त्याने सामाजिक व्यवस्था ढासळत चालल्याचे स्पष्ट मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. नुकतेच त्यांनी एका युट्यूब पॉडकास्टमध्ये लिव्ह इन रिलेशनशीपवर मत व्यक्त केले.
गडकरी म्हणाले की, एकदा ब्रिटीश संसदेच्या भेटीसाठी ते लंडनला गेले होते. तिथे त्यांनी ब्रिटिश पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री यांना देशातील प्रमुख समस्यांबाबत विचारले होते. या दरम्यान त्यांनी सांगितले की, युरोपीय देशांमध्ये समस्या अशी आहे की, पुरुष आणि महिलांना लग्न करण्यात रस नसून ते लिव्ह इन रिलेशनशीपला प्राधान्य देतात. पुढे गडकरी म्हणाले की, जर लोक लग्नच करणार नाहीत तर मुलं कशी होणार आणि मुलांचे भविष्य काय असणार? ते म्हणाले जर तुम्ही सामाजिक व्यवस्थाच मोडली तर लोकांवर काय परिणाम होणार?
हिंदुस्थानला आज अधिक मुलांची गरज आहे की कमी मुलांची? यावर गडकरींनी उत्तर दिले. प्रश्न हा नाही. आई-वडिलांचे कर्तव्य आहे की मुलांना जन्म द्यावा आणि त्यांचे पालन पोषण योग्य पद्धतीने करावे. मौजमजेसाठी मुलांना जन्म देऊ नका, तर काहीच होऊ शकत नाही. गडकरी पुढे म्हणाले की, लिव्ह इन रिलेशनशिपमुळे समाज नष्ट होईल, असेही गडकरी म्हणाले. समाजात काही नियम आहेत आणि ते पाळले पाहिजेत यावर त्यांनी भर दिला. समलैंगिक विवाहावर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, यामुळे समाजरचना कोसळेल.
हिंदुस्थानात घटस्फोटावर बंदी आणावी का, असे विचारले असता ते म्हणाले, अजिबात नाही. पण लिव्ह-इन संबंध चांगले नसतात. देशातील लिंग गुणोत्तर राखण्याच्या महत्त्वावरही गडकरींनी भर दिला. जर 1,500 स्त्रिया आणि फक्त 1,000 पुरुष असतील अशी वेळ आली तर आम्हाला पुरुषांना दोन बायका ठेवण्याची परवानगी द्यावी लागेल, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे, ऑक्टोबर 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला होता. मात्र, केंद्र सरकारने यावर कोणताही कायदा केला नसला तरीही राज्ये समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारे कायदे करू शकतात, असे न्यायालयाने म्हटले होते.