कोणी किती बोलायचे वेळ कुणी ठरवली, आज आलो का सभागृहात? वेळ निश्चितीवरून विधान परिषदेत भिडाभिडी

राज्यपालांच्या अभिभाषणावर बुधवारी विधान परिषदेत चर्चा झाली. या वेळी राष्ट्रवादीच्या एकनाथ खडसे यांचे भाषण दहाव्या मिनिटाला थांबवले गेले. त्यावरून खडसे यांनी आक्षेप घेतला. तुमची-माझी काय दुश्मनी आहे, माझ्याच भाषणासाठी तुमच्याकडे वेळ कमी असतो का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. माझे भाषण किती वाजता सुरू झाले ती वेळ सांगा, अशी मागणी केली.

तालिका सभापती अनिकेत तटकरे यांनी खडसे यांना त्यांचे भाषण 11.27 वाजता सुरू झाल्याने आपण दहा मिनिटांनी 11.37 वाजता बेल वाचवून थांबण्यास सांगितले, असे उत्तर दिले. त्यावर सत्ताधारी पक्षातील प्रवीण दरेकर यांना 22 मिनिटे दिली गेली, अतुल सावे 15 मिनिटे बोलल्याची आठवण खडसेंनी करून देत तुमचा माझ्यावर आकस आहे का, असा सवाल केला. त्यावर मंत्री शंभुराज देसाई यांनी आकस या शब्दाला आक्षेप घेतला.

खडसे यांना दाबले जातेय असे लक्षात येताच शिवसेनेचे गटनेते अनिल परब यांनी उभे राहून तालिका सभापतींनाच विचारले की, कोणी किती बोलायचे ही वेळ कुणी निश्चित केली, तसा काही नियम आहे का, असेल तर मला पुस्तकात दाखवा. विरोधी सदस्य ऐकून घेतात म्हणून चेपता का, असा संतापही त्यांनी व्यक्त केला. तटकरे यांनी त्यावर नियम 62 वाचून दाखवला. सभागृहाचे मत घेऊन सदस्याच्या भाषणाची वेळ सभापती वाढवू शकतात असे त्यात नमूद होते. त्यावरच बोट ठेवत अनिल परब यांनी सभापती आणि शंभुराज देसाई यांना कचाटय़ात पकडले. सभागृहाचे मत घेतले का मग, असे त्यांनी विचारताच शंभुराज निरुत्तर झाले, तर तटकरे यांनी काल झालेल्या बैठकीतच चर्चेची वेळ निश्चित करण्यात आली होती, असे सांगितले.