मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. भाषेचा गौरव होतोय, त्याचबरोबर मराठी भाषेचे संवर्धन आणि संरक्षण होण्याचीदेखील गरज आहे. मुंबईत दुसरीकडे काही हाऊसिंग सोसायटीमध्ये मराठी माणसाला घर घेता येणार नाही असे म्हणण्याची हिंमत कशी होते, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी विधानसभेत केला.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना वरुण सरदेसाई यांनी सभागृहात आपले पहिले भाषण केले. मराठी भाषेचा गौरव होत आहे, तर दुसरीकडे मुंबईत विरेन शहा नावाचा माणूस मराठी पाटय़ा लावू नका असे म्हणत आहे. मराठी पाटय़ा लावण्याचा कायदा असतानादेखील असे म्हणण्याचे धाडस कसे होते? विरेन शहा याच्यामागे कोणती शक्ती उभी आहे हे शोधून काढले पाहिजे, असे वरुण सरदेसाई म्हणाले. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या प्रकरणामध्ये अद्याप कोणत्याही अधिकाऱयावर कारवाई झाली नाही अथवा कोणालाही बडतर्फ केले नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
राज्यात विद्यार्थी आणि तरुणांना स्किल डेव्हलपमेंट प्रशिक्षण दिले जात आहे. परंतु त्याचे पुढे काय होते, त्यांना रोजगार मिळतो का? राज्यात अनेक उद्योगांसाठी सामंजस्य करार करण्यात आले. परंतु या पंपन्या बाहेरच्या राज्यात किंबहुना बाहेरच्या देशात निघून गेल्या त्याचा खेद वाटतो, असे वरुण सरदेसाई यांनी लक्ष वेधले.
– आवास योजनांची मुंबईत पाहिजे तशा पद्धतीने अंमलबजावणी होत नाही. 2018 मध्ये डिफेन्स जमिनीसंदर्भात समिती स्थापन केली. आज 2025 साल आले तरी समितीचा अहवाल आलेला नाही. भारत नगरमधील रहिवाशांचा पुनर्विकास हा म्हाडामार्फत करावा अशी त्यांची मागणी आहे; परंतु एसआरएचे काही बिल्डर्स या रहिवाशांना जबरदस्ती करत असल्याचे वरुण सरदेसाई यांनी निदर्शनास आणले.