दिल्लीत 60 वर्षांवरील वृद्धांवर मोफत उपचार

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज वृद्धांना मोफत उपचार देणारी ‘संजीवनी’ योजना जाहीर केली. आप सत्तेत आल्यास 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचार देण्याची घोषणा केजरीवाल यांनी केली होती. यापूर्वी केजरीवाल यांनी वृद्धांना अडीच हजार रुपये पेन्शन व रिक्षा चालकांसाठी 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा आणि महिलांसाठी 1 हजार रुपये प्रतिमहिना अशी घोषणा केली होती. दिल्ली विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ 23 फेब्रुवारी 2025 रोजी संपत आहे. येत्या दोन महिन्यांत निवडणूक होऊ शकते. दरम्यान, संजीवनी योजनेसाठी येत्या दोन ते तीन दिवसांत नोंदणी सुरू होणार असल्याचे केजरीवाल म्हणाले. आपचे स्वयंसेवक घरोघरी जाऊन पात्र ज्येष्ठ नागरिकांची नावे योजनेसाठी नोंदवून घेतील. तसेच निवडणुकीनंतर या योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.