भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अमित शहांकडून घोर अवमान, गल्लीपासून दिल्लीपर्यंत देशभरात तीव्र पडसाद

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत बोलताना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा घोर अवमान केला. आजकाल आंबेडकरांचे नाव सारखे सारखे घेणे ही फॅशन झाली आहे, असे म्हणत त्यांनी महामानवाबद्दल अनुद्गार काढले. त्याचे तीव्र पडसाद आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत उमटले. प्रचंड जनक्षोभ उसळला. देशभरात संतप्त जनता रस्त्यावर उतरली. शहांच्या दिल्लीतील घराला घेराव घालण्यात आला आणि त्यांची प्रतिमा पायदळी तुडवत जाळण्यात आली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी मोदी सरकार आणि अमित शहा यांच्या विरोधात देशभरात निदर्शने करण्यात आली. त्याचबरोबर अदानी प्रकरण आणि मणिपूर हिंसाचाराच्या मुद्दय़ावरूनही ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्रासह सर्व राज्यांतील राजभवनावर मोर्चा काढण्यात आला.

अमित शहांची सारवासारव

राज्यसभेत मी जे काही बोललो त्याचा विपर्यास केला गेला. काँग्रेसने त्याची मोडतोड केली असून मी याचा निषेध करतो, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन सारवासारव केली. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नेहमीच विरोध केला असे शहा म्हणाले.

उत्तर प्रदेश, आसाममध्ये दोघांचा मृत्यू

उत्तर प्रदेश आणि आसाममध्ये आंदोलन करणाऱया काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला तसेच अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. यात काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेश विधानसभेबाहेर आंदोलन करणाऱया कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. यात गंभीर जखमी झालेल्या प्रभात पांडे या 28 वर्षीय कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. आसाममध्ये अदानी लाचखोरी प्रकरण आणि मणिपूर हिंसाचारप्रकरणी आंदोलन करणाऱया काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या धुरामुळे श्वास कोंडून काँग्रेस कार्यकर्ता मृदुल इस्लाम (45) याचा मृत्यू झाला.

शहांनी सत्य सांगितल्यानेच काँग्रेसची नाटके – मोदी

अमित शहा यांनी सभागृहात सत्य सांगितल्यानेच काँग्रेसने नाटके सुरू केली आहेत. डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल आम्हाला सर्वाधिक आदर असून अमित शहा यांनी काँग्रेसचा पर्दाफाश केला आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांची पाठराखण केली आहे. जर काँग्रेस आणि त्यांच्या भ्रष्ट व्यवस्थेला असे वाटत असेल की त्यांच्या या दुष्ट अपप्रचारामागे गेल्या अनेक वर्षांपासून ते करत असलेले गैरप्रकार लपवू शकतात, विशेषतः डॉ. आंबेडकर यांचा अवमान करण्यासारखे प्रकार तर ही त्यांची मोठी चूक ठरेल, असे मोदींनी म्हटले आहे.

भाजपच्या जुन्या प्लॅनमध्ये बाबासाहेब अडसर – आंबेडकर

भाजप आणि संघाचे जे काही जुने प्लॅन आहेत ते आता अमलात आणण्यासाठी त्यांना काँग्रेस नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर अडसर आहेत. त्यामुळेच त्यांचा जळफळाट होत आहे. तोच जळफळाट त्यांच्या वक्तव्यातून बाहेर आला, अशी जहरी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. भाजप आता जन्माला आला आहे. त्यांच्या आधी जनसंघ होता. त्याच्या आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता. सर्वात मोठा विरोध बाबासाहेबांना कुणी केला असेल तर तो या संघटनेने केला, असा आरोपही त्यांनी केला.

पापे लपवण्यासाठी म्हणून मोदींकडून शहांचा बचाव – खरगे

शहांची मंत्रिमंडळाकडून हकालपट्टी करायला हवी होती. परंतु एक्सवर 6 पोस्ट करून त्यांनी शहांचा बचाव केला. जिगरी दोस्त आहेत. त्यामुळेच ते एकमेकांची पापे लपवत आहेत, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तोफ डागली. जो संविधानाची शपथ घेऊन मंत्री बनतो आणि तो त्याच संविधानाचा अपमान करत असेल तर त्याला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, असे सांगतानाच मोदींना आंबेडकर यांच्याबद्दल श्रद्धा असेल तर त्यांनी शहा यांना मंत्रिमंडळातून काढावे, अशी मागणीही खरगे यांनी केली.

भाजपाला राज्यघटना नष्ट करायचीय – राहुल गांधी

भाजपला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान आणि त्यांनी लिहिलेली राज्यघटना नष्ट करायची आहे. हे संपूर्ण जगाला माहीत आहे. त्यांनी नेहमीच राज्यघटनेचा विरोध केला. त्यांना संविधान बदलायचे आहे, अशा शब्दांत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. संसद परिसरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली. देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान कदापि सहन करणार नाही, असा इशारा देत राहुल गांधी यांनी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

संसद ठप्प… अमित शहा राजीनामा द्या!

संसदेच्या दोन्ही सभागृहांतही ‘जय भीम’च्या घोषणा देत विरोधकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तसेच संपूर्ण देशाची माफी मागण्याची मागणी लावून धरली. लोकसभेचे कामकाज सुरुवातीला 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतर कामकाज सुरू होताच विरोधकांनी पुन्हा गदारोळ घातला. सरकारने गदारोळात कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काँग्रेस खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे कामकाज ठप्प झाले. महाराष्ट्र विधिमंडळातही तीव्र पडसाद उमटले.