मल्ल्याची संपत्ती विकून 14 हजार कोटींची वसुली; केंद्र सरकारचा लोकसभेत दावा

कोट्यावधी रुपयांचे कर्ज बुडवून फरार झालेल्या उद्योजक विजय मल्ल्याची संपत्ती विकून सरकारी बँकांनी 14,131 कोटी रुपये वसूल केले. केंद्र सरकारने लोकसभेत ही माहिती दिली. तसेच फरार हिरे व्यापारी नीरव मोदीकडून 1,052.58 कोटी आणि मेहुल चोक्सी व इतरांकडून 2,565.90 कोटी रुपयांची वसुली केली आहे.

कोट्यवधीचे कर्ज बुडवून देशाबाहेर पळालेल्या घोटाळेखोरांकडून कर्जवसुली केली जात आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काही मोठ्या प्रकरणांत एकूण 22,280 कोटी रुपये वसूल केले. फरार आर्थिक गुन्हेगारांची संपत्ती जप्त करून घोटाळ्य़ांतील पीडितांना त्यांचे हक्काचे पैसे परत केले, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी लोकसभेत सांगितले.

माझ्याकडून दुप्पट कर्ज वसूल केलेय! मल्ल्याचा केंद्रावर पलटवार

कर्ज वसुलीच्या दाव्यावरून विजय मल्ल्याने केंद्र सरकारवर पलटवार केला. कर्जवसुली लवादाने दिलेल्या निकालानुसार माझे थकीत कर्ज 6203 कोटी रुपये आहे. यात 1200 कोटी रुपयांचे व्याज समाविष्ट आहे. असे असताना माझ्याकडून दुप्पट कर्ज कसे काय वसूल केले? मी अद्याप आर्थिक गुन्हेगार कसा? ईडी व बँकांनी याचा खुलासा करावा, असे आव्हान मल्ल्याने ‘एक्स’वरून दिले.