सार्वकालिक महान खेळाडू रविचंद्रन अश्विनने बुधवारी निवृत्तीची घोषणा करताच त्याच्यावर क्रिकेट जगतातून कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आणि संघ सहकाऱयांसह क्रिकेट जगताने या मॅचविनर गोलंदाजाच्या कारकीर्दीला मानाचा मुजरा केला.
टीम इंडियातील 14 वर्षांपासून त्याचा सहकारी असलेला विराट कोहली आपली प्रदीर्घ मैत्री आठवून भावुक झाला तर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी अश्विनचा प्रभाव भावी पिढीवर निश्चितच असेल, अशा शब्दांत कौतुक केले. कोहलीने ‘एक्स’वर लिहिले की, ‘मी 14 वर्षे तुझ्यासोबत खेळलो. आज जेव्हा तू सांगितले की, तू निवृत्ती घेत आहे. त्यामुळे मी भावुक झालो आणि एवढी वर्षे सोबत खेळण्याच्या आठवणीने मनामध्ये फेर धरला.’ अश्विनने गाबावर तिसरा कसोटी सामना बरोबरीत सुटल्यानंतर पत्रकार परिषदेत निवृत्तीची घोषणा केली.
‘एक युवा गोलंदाज ते आधुनिक क्रिकेटमधील दिग्गज अश्विन घडताना पाहणे हे माझे भाग्यच म्हणावे लागेल. मला ठाऊक आहे की, येणाऱया पिढय़ा म्हणतील की, आम्ही अश्विनमुळे गोलंदाज झालो. तुझी उणीव जाणवेल भाई.’ – गौतम गंभीर, मुख्य प्रशिक्षक हिंदुस्थानी संघ.
‘अॅश (अश्विन), अद्भुत कारकीर्दीबद्दल अभिनंदन मित्रा. माझ्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात तू एक अमूल्य संपत्ती होता आणि तुझ्या कौशल्याने आणि कलेने तू खेळाला खूप समृद्ध केलेस.’ – रवी शास्त्री, टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक
‘तू गोलंदाजी करत असताना स्लिपमध्ये उभे राहण्याचा कंटाळवाणा क्षण कधीच आला नाही. प्रत्येक चेंडूला संधी चालून आल्यासारखे वाटले. तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.’ – अजिंक्य रहाणे, क्रिकेटपटू
‘कसोटी क्रिकेटपटू म्हणून तुझी महत्त्वाकांक्षा वाखाणण्याजोगी होती. एका दशकाहून अधिक काळ हिंदुस्थानी फिरकी गोलंदाजीची धुरा सांभाळल्याबद्दल अभिनंदन.’ – हरभजन सिंग, माजी फिरकीपटू
‘तुमचा प्रवास विलक्षण झाला आहे. 700 हून अधिक आंतरराष्ट्रीय बळी आणि तुम्ही मैदानावर खेळलेल्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहात. अप्रतिम कारकीर्दीबद्दल अभिनंदन आणि मैदानाबाहेर उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा. – अनिल कुंबळे, माजी कर्णधार
‘ऍश, चांगला खेळलास आणि एका अप्रतिम प्रवासाबद्दल अभिनंदन. फिरकीच्या जादूने जगातील सर्वोत्तम खेळाडूंना तू नेहमी जाळय़ात अडकवलेस. कठीण परिस्थितीत खेळपट्टीवर खंबीरपणे उभे राहून फलंदाजी केलीस. हिंदुस्थानी क्रिकेटचा तू खरा हीरो आहेस.’ – युवराज सिंग, माजी क्रिकेटपटू
‘सहा कसोटी शतके झळकावणारा या यादीतील एकमेव खेळाडू. अश्विन (537 बळी) कसोटीत मुथय्या मुरलीधरन (800), शेन वॉर्न (708) आणि अनिल कुंबळे (619) यांच्यानंतरचा चौथा यशस्वी फिरकीपटू आहे.’ – हर्षेल गिब्ज, माजी क्रिकेटपटू दक्षिण आफ्रिका
‘सार्वकालीन दिग्गज खेळाडूने निवृत्ती घेतली. असाधारण कारकीर्दीत शानदार कामगिरी केली. तुझ्यासोबत खेळलो याचा अभिमान वाटतो. तामीळनाडूकडून खेळणारा तू निश्चितपणे सार्वकालीन महान खेळाडू आहेत. निवृत्तीनंतर कुटुंब आणि मित्रांसह आनंद घ्या.’ – दिनेश कार्तिक, माजी क्रिकेटपटू