एक देश एक निवडणुकीचा पायाच चुकीचा, खासदार अरविंद सावंत यांची टीका

निवडणूक आयुक्त निवडण्याच्या समितीतच घोळ आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे. तसेच एक देश एक निवडणुकीचा पायाच चुकीचा अशी टीकाही सावंत यांनी केली.

अरविंद सावंत म्हणाले की, एक देश एक निवडणूक ही बाब छोटी नसून गंभीर आहे. One Nation One Election हे ऐकायला चांगलं वाटतं. पण त्याची मुळं ही निवडणूक आयोगातून सुरू होतात. जो निवडणूक आयुक्त निवडला जातो, त्यातच गडबड आहे. निवडणूक आयुक्त निवडण्याच्या समितीतच घोळ आहे. निवडणूक आयुक्त निवडण्याच्या समितीत आधी पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षनेते. भाजपने या समितीतून सरन्यायाधीशांना वगळलं. आणि त्यांच्या जागी पंतप्रधान ज्या मंत्र्याला नियुक्त करतील तो त्या समितीत असेल. याचा अर्थ दोन व्यक्ती निवडणूक आयोगाचा आयुक्त ठरवणार. आणि तो आयुक्त यांचा गुलाम असणार, त्यामुळे एक देश एक निवडणुकीचा पायाच चुकीचा आहे, आधी यात बदल करा. असे अरविंद सावंत म्हणाले.

तसेच टी.एन. शेषन हेच उत्तर निवडणूक आयुक्त उत्तम होते, त्यांना सगळे घाबरायचे, आज ते नाहीत त्यामुळे चुकीची पाया असल्याने एक देश एक निवडणुकीची इमारतीबाबत चर्चा नंतर केली जाईल. जी व्यक्ती निष्पक्षः निवडणूक घेऊ शकत नाही त्यांच्या हाती व्यवस्था देण्यात अर्थ नाही असेही सावंत म्हणाले.