जिंदाल कंपनीने गॅस वाहतूक आणि साठवणूक त्वरीत बंद करावी, शाळेतील सभेत पालकांची मागणी

जयगड येथील जिंदाल पोर्ट कंपनीमध्ये झालेल्या वायूगळतीच्या पार्श्वभूमीवर आज माध्यमिक विद्यामंदिर जयगड येथे पालकांची सभा झाली. या सभेमध्ये पालकांनी विविध मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये बाधित झालेल्या विद्यार्थ्यांचा मेडिकल रिपोर्ट करणे, शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षकांचा आरोग्यविमा काढणे आणि जिंदाल कंपनीने जयगडमध्ये 100 खाटांचे अद्ययावत रुग्णालय उभारावे. तसेच गॅस साठवणूक आणि गॅस वाहतूक त्वरीत बंद करावी, अशा प्रमुख मागण्या केल्या. या मागण्यांचे निवेदन घेऊन ग्रामस्थ जिंदाल कंपनीच्या प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थ आणि पालकांनी दिला.

माध्यमिक विद्यामंदिर जयगडमध्ये आज पालकांची सभा पार पडली. या सभेमध्ये जिंदाल कंपनीत झालेल्या वायूगळतीवर चर्चा झाली. पालकांनी आपापली मते मांडली. त्यानंतर सर्वानुमते 16 मागण्या निश्चित करण्यात आल्या. त्यामध्ये बाधित विद्यार्थ्यांचे मेडिकल रिपोर्ट करणे, शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षकांचा आरोग्यविमा कंपनीने काढावा, विद्यार्थ्यांना भविष्यात उदभवणाऱ्या सर्व आजारांची जबाबदारी जिंदाल कंपनीने घ्यावी. शाळेच्या आवारात सुसज्ज रुग्णवाहिका व त्यामध्ये एक तज्ज्ञ डॉक्टर कायमस्वरुपी उपलब्ध असावा. विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी नियमित करावी. कंपनीने गॅस वाहतूक व गॅस साठवणूक त्वरीत बंद करावी. कंपनीने 100 खाटांचे अद्ययावत रुग्णालय उभारावे. उर्जा रुग्णालयात तीनही शिफ्टमध्ये तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असावा. उर्जा रुग्णालयातून डॉक्टर कुंभार यांना काढून टाकावे. या रुग्णालयात तज्ज्ञ परिचारिका नियुक्त कराव्यात. वायूगळतीमुळे बाधित झालेल्या विद्यार्थ्यांच्या उपचाराचा आणि अन्य खर्च कंपनीने करावा, अशा विविध मागण्यांचा समावेश आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयातून उपचारानंतर सर्व विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र त्या विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना पुन्हा रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आता ३८ वर गेली आहे. काही विद्यार्थ्यांना आज सायंकाळी डिस्चार्ज देण्यात आला.