मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाजवळ नौदलाच्या बोटीने एका प्रवाशी बोटीला धडक दिल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 101 जणांना वाचवण्यात यश आलं आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मृतांमध्ये 10 नागरिकांसहित 3 नौदलाच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 4 वाजेच्या सुमारास नौदलाच्या बोटीची चाचणी सुरु होती. यावेळी नौदलाच्या बोटीचे नियंत्रण सुटले आणि नील कमल या प्रवासी फेरीला धडकली. ही प्रवासी बोट गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटा येथे प्रवाशांना घेऊन जात होती.
तटरक्षक दल आणि सागरी पोलिसांच्या समन्वयाने नौदलाने तातडीने शोध आणि बचाव कार्य सुरू केले. चार नौदल हेलिकॉप्टर, 11 नौदल क्राफ्ट, एक तटरक्षक नौका बचावकार्यात गुतंले आहेत. दरम्यान, जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून बचावकार्य अद्यापही सुरू आहे.