Ratnagiri News – वायूगळती झालेल्या मिरजोळे एमआयडीसीतील कंपनीचा शोध सुरू

रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील जिंदाल पोर्ट कंपनीतील वायूगळतीचे प्रकरण ताजे असतानाच मिरजोळे एमआयडीसीमध्ये मंगळवारी (17 डिसेंबर 2024) रात्री वायूगळती झाल्याची घटना घडली आहे. परिसरात राहणाऱ्या नागरीकांना वायूगळतीच्या वासाचा त्रास झाला. मिरजोळे एमआयडीसी पासून कुवारबाव, साळवीस्टॉप पर्यंतच्या परिसरात हा वायूगळतीचा वास पसरला होता. जिंदाल पोर्टमध्ये झालेल्या वायूगळतीनंतर रत्नागिरीतही वायूगळती झाल्यामुळे नागरीकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.

गेल्या आठवड्यात जयगड येथील जिंदाल पोर्ट कंपनीमध्ये एलपीजी वायूगळती झाली होती. या वायूगळतीमुळे माध्यमिक विद्यामंदिर जयगड येथील 68 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली होती. या वायूगळतीचा विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास झाला. कारण जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर पुन्हा विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. 38 विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिंदाल कंपनीच्या वायूगळतीचे प्रकरण तापलेले असतानाच मंगळवारी रात्री मिरजोळे एमआयडीसी परिसरात वायूगळती झाली. या वायूगळतीमुळे मिरजोळेपासून आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरली. नागरीकांना दुर्गंधीचा त्रास होऊ लागला. वायूगळती झाल्याचे समजताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले. वायूगळतीची माहिती प्रशासनाला कळवण्यात आली. वायूगळती झाल्याची माहिती मिळताच प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, ग्रामीण पोलीस निरिक्षक राजेंद्र यादव यांनी मिरजोळे परिसरात धाव घेतली. मात्र रात्र असल्यामुळे वायूगळती कोणत्या कंपनीमधून झाली हे निदर्शनास आले नाही. मात्र आज एमआयडीसीमध्ये वायूगळती झालेल्या कंपनीचा शोध सुरू आहे.

रत्नागिरी एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनी तसेच गॅस प्रकल्पही आहे. रात्रीच्या वेळी वायूगळतीची दुर्गंधी पसरल्यामुळे ही गळती कुठून झाली याचा अंदाज आला नाही. मात्र आज दुसऱ्या दिवशी वायूगळती झालेल्या कंपनीचा शोध सुरू झाला आहे. जिंदाल कंपनीच्या प्रकरणानंतर एमआयडीसी परिसरातही वायूगळती झाल्यामुळे आता जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कंपन्या सुरक्षेची मापके पाळतात की नाही? कंपन्यांना दिलेल्या सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत आहेत का? असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.

मंगळवारी रात्री वायूगळती झाली. ही वायूगळती कोणत्या कंपनीतून झाली हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र आमचे पथक वायूगळती झालेल्या कंपनीचा शोध घेत आहेत, अशी माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली आहे. मिरजोळे एमआयडीसीतील ऑक्टेल कंपनीमध्ये सॉल्वनची प्रक्रीया सुरू होती. त्याचा वास पसरला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र आम्ही अधिक तपास करत आहोत. आज सकाळीही आम्ही त्या परिसरात पाहणी केली, अशी माहिती प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी दिली.