भाजपची आंबेडकरांविषयी असलेली मानसिकता अमित शहांच्या तोंडून बाहेर आली, आदित्य ठाकरे यांची टीका

कोट्यवधी जनतेसाठी बाबासाहेब देवच आहे. जसे त्यांनी या देशाला संविधान, न्याय हक्क दिले, ते देवच आहे, असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. तसेच भाजपची आंबेडकरांविषयी असलेली मानसिकता अमित शहांच्या तोंडून बाहेर आली अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली. आज नागपुरात आदित्य ठाकरे यांनी दीक्षाभुमीला भेट दिली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

दीक्षाभुमीला भेट दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पोटात जे आहे ते आता ओठांवर आले आहे. डॉ. आंबेडकर हे जगभरातील अनुयायांचे दैवतच आहे, परंतु त्यांच्याबाबत भाजपची जी मानसिकता आहे, ती अमित शहा यांच्या मुखातून बाहेर आली आहे अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. अमित शहा यांच्या ह्या व्हिडिओत विपर्यास असेल, असे ते सांगत असतील तर त्यांनी माफी मागून मोकळं व्हायला पाहिजे असेही आदित्य ठाकरे म्हणाले. अमित शहा म्हणाले की मी स्वप्नातही डॉ. आंबेडकरांचा अपमान नाही करू शकत. पण अमित शहा यांनी संसदेतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला असेही आदित्य ठाकरे म्हणाले.